शेवटचं कधी रडली होतीस? प्रश्नावर स्मृती मानधनाचा खुलासा; म्हणाली, “आयुष्यातील घटनांसाठी रडणं अन्…”

माझ्या आयुष्यात जे घडतं त्यासाठी रडत बसत नाही असं भारताची क्रिकेटपटू स्मृती मानधनाने म्हटलं आहे. राज शमानी यांच्या ‘फिगरिंग आऊट विथ राज शमानी’ या पॉडकास्टमध्ये स्मृती बोलत होती. राजने स्मृती मानधनाची क्रिकेट व्यतिरिक्त इतर दिनचर्या, तिच्या आवडी-निवडी जाणून घेतल्या.

स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी लग्न होणार होते. मात्र काही कारणांमुळे हे लग्न होऊ शकले नाही. ७ डिसेंबर रोजी स्मृती मानधनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लग्न रद्द झाल्याचे जाहीर केले. हा खासगी निर्णय असून आपल्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर केला जावा, अशी विनंती स्मृतीने या पोस्टमध्ये केली होती. त्यानंतर तिने कधीही याबद्दल जाहीर भाष्य केले नाही.

“तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण रात्र कोणती?”, असा प्रश्न राज शमानीने स्मृती मानधनाला विचारला. या प्रश्नानंतर स्मृती मानधना काही वेळ भावुक झाल्यासारखी दिसली. तिचा आवाज खोल गेला. तिचे डोळे भरून आल्यासारखे दिसले. मात्र पुढच्याच क्षणाला तिने स्वतःला सावरले. “मी फक्त क्रिकेटबद्दल बोलेन”, असे तिने स्पष्ट केले.

थोडा वेळ थांबल्यानंतर स्मृती मानधनाने कठीण रात्रीबद्दल उत्तर दिले. ती म्हणाली, आयसीसी वर्ल्डकप दरम्यानच्या रात्री कठीण गेल्या. यानंतर तिने कोविडचा काळही कठीण होता, असेही म्हटले.

यानंतर राजने स्मृतीला तू शेवटचं कधी रडली होतीस असं विचारलं. या प्रश्नानंतर स्मृती भावुक झाली. मात्र काही सेकंदात स्वत:ला सावरत तिने उत्तर दिलं. ती म्हणाली, चांगला प्रश्न आहे. शेवटची कधी रडलेय, आठवत नाही. मला चित्रपट पाहताना रडू येतं. माझ्या आयुष्यातल्या घटनांसाठी मी रडत नाही. मी चित्रपट, वेबसीरिज पाहत असेन तर डोळ्यातून पाणी येतं. जसं काही दिवसांपूर्वी मी मुसाफिर कॅफे पाहिला. ती गोष्ट पाहून डोळ्यातून पाणी आलं. पण ते आनंदाश्रू होते. त्या गोष्टीने मला राहवलं नाही. ज्या पद्धतीने त्या सीरिजमधली पात्रं वागतात. मलाही तसंच काहीसं वागायला आवडेल.

‘मला सहानुभूती अजिबात आवडत नाही. कोणत्याही प्रकारची सहानुभूती मला जराही आवडत नाही. बिचारी, केविलवाणी वगैरे म्हणून कोणी माझा विचार केलेला किंवा पाहिलेलं आवडत नाही’, असं स्मृतीने सांगितलं. ‘माझ्या आयुष्यात काही घडलं असेल, मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला असेल, मी त्यातून सावरून पुनरागमन करेन.

स्मृतीच्या आयुष्यात लग्नाच्या निमित्ताने जे वादळ घोंघावलं त्यासंदर्भात थेट न विचारता राज यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण स्मृतीने क्रिकेटबद्दलच सांगेन असं सांगितलं. भारतीय संघाची उपकर्णधार असलेल्या स्मृतीच्या नावावर असंख्य विक्रमांची नोंद आहे. ९ कसोटी, १२० वनडे आणि १७४ टी२० सामन्यात तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तिन्ही प्रकारात शतक झळकावणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये तिचा समावेश आहे. स्मृतीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने वूमन्स प्रीमिअर लीगच्या जेतेपदावर नाव कोरलं होतं. आयसीसी प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराने स्मृतीला दोनदा सन्मानित करण्यात आलं आहे. २०१९ मध्ये स्मृतीला प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

Comments are closed.