कल्याणमध्ये ‘नागा’पूर, २० पिल्लांची सुटका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कल्याणच्या गांधारी परिसरात एका घरात नागाची २० पिल्ले आढळून आली. सर्पमित्र कपिल कारभारी यांनी तत्परता दाखवत अशोक लोखंडे यांच्या घरातून सर्व पिल्ले पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडल्याने संभाव्य धोका टळला.

शनिवारी अशोक लोखंडे यांना घरातील एका कोपऱ्यात सापाची वळवळणारी पिल्ले आढळून आली. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने पिल्ले दिसल्याने लोखंडे कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अशोक लोखंडे यांनी तात्काळ सर्पमित्र कपिल कारभारी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तातडीने कारभारी यांनी घटनास्थळी धाव घेत सावधगिरी बाळगत सर्व पिल्ले सुरक्षितपणे पकडून एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये ठेवली. त्यानंतर वनविभागाच्या नियमांचे पालन करत ही पिल्ले शहरापासून दूर असलेल्या जंगलात सोडण्यात आली.

गांधारीत सापांचा वावर

कल्याणमधील गांधारी परिसरात नेहमीच सापांचा वावर असतो. काही दिवसांपूर्वी एका निवासी संकुलात नागिणीने २४ अंडी दिली होती. ही अंडी वनविभागाने ताब्यात घेऊन सुरक्षित ठेवली होती. ५० दिवसांनंतर या अंड्यांमधून नागाची २० पिल्ले जन्माला आली.

यानंतर याच परिसरात किंग कोब्राची मादी पकडली होती. चारच दिवसांत या कोब्राने ११ अंडी दिली होती. ही अंडी वनविभागाने एका कोवळ्या पेटीत सुरक्षित ठेवली होती. दीड महिन्यानंतर या अंड्यांमधून ११ पिल्ले जन्माला आली होती. त्यानंतर नागिणीला आणि पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले होते. आता पुन्हा नागाच्या २० पिल्लांना गांधारी परिसरात पकडण्यात आले आहे.

Comments are closed.