पुजाच्या नावे जानेवारी महिन्यातच जमीन खरेदी, गोविंद होता साक्षीदार; नर्तिका प्रकरणी नवा ट्विस्ट
सोलापूर क्राइम न्यूज: बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी रोज नवीन नवीन खुलासे होत आहे. गोविंद बर्गे (Govind Barge) यांनी सोलापूर जिल्ह्यातील सासुरे गावात कला केंद्रात काम करणारी नर्तिका पूजा गायकवाड हिच्या घरासमोर स्वत:च्याच चारचाकी गाडीमध्ये बसून आत्महत्या केली होती. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी पूजा गायकवाडच्या नावे जानेवारी महिन्यातच जमीन खरेदी झाली होती. या खरेदीत गोविंद साक्षीदार होता. त्यामुळं आता या प्रकरणी नवा ट्विस्ट आला आहे.
गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणातील आरोपीच पूजा गायकवाडच्या नावे लाखोंची जमीन असल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणातील आरोपी पूजा गायकवाड हिच्या नावावर बार्शीतील वैराग येथे दोन गुंठे जमीन असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे मृत गोविंद बर्गे हे स्वतः ह्या जमीन खरेदी प्रकरणात साक्षीदार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी 2025 मध्ये ह्या जमिनीचे व्यवहार झाले असून गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड हिचा भाऊ प्रशांत गायकवाड यांचा साक्षीदार म्हणून उल्लेख आहे. पूजा गायकवाड ही कला केंद्रात काम करणारी नर्तिका असून तीने पैसे आणि घर नावावर करण्यासाठी तगादा लावल्यानेच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. दरम्यान गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी पूजा गायकवाड हिला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली होती. तिची पोलीस कोठडी उद्या संपणार असून पून्हा एकदा न्यायलयात हजर केले जाणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
गोविंद बर्गे यांना तमाशा बघण्याचा नाद होता. ते अनेक कला केंद्रात जायचे. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांची थापडीतांडा येथील कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली. कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते. या दोघांचे प्रेमाचे नाते घट्ट झाल्यावर पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने घेतले होते. गोविंद बर्गे यांनी पूजाच्या नातेवाईकांच्या नावावरही काही जमीन केली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते. पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणे टाकले होते. तिने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा, असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता. आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही पूजाने गोविंद बर्गे यांना दिल्याचे समजते. या सगळ्यामुळे गोविंद बर्गे प्रचंड दुखावले गेले होते. प्रेमात फसवणूक झाल्याने ते नैराश्याच्या गर्तेत ढकलले गेले होते.
गोविंद बर्गे हे पूजाला अनेकदा फोन करत होते. मात्र, ती त्यांचा फोन उचलत नव्हती, त्यांच्याशी एक शब्दही बोलत नव्हती. सोमवारी मध्यरात्री ते पूजा गायकवाड हिचं सासुरे येथील घरी आले होते. याठिकाणी दोघांमध्ये नेमके काय झाले, हे माहिती नाही.
आणखी वाचा
Comments are closed.