शरणू हांडे अपहरण प्रकरणात आणखी दोघांना कर्नाटकातील इंडी भागातून घेतलं ताब्यात; गुन्ह्यातील सहभा
सोलापूर : राजकीय वैमनस्यातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ स्मारक समितीचे सदस्य आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हंडे यांना घरासमोर मारहाण करत कारमध्ये घालून अपहरण केल्याची थरारक घटना अक्कलकोट रोडवरील साईनगर येथे गुरुवारी (दि. 7) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी कर्नाटकातील इझळकी येथून आरोपींना पाच तासात पकडले शुक्रवारी आमदार गोपीचंद पडळकर यांनी हंडे यांची भेट घेऊन या हल्ल्याचे मास्टरमाइंड आमदार रोहित पवार असल्याचा आरोप केला. याप्रकरणी अमित म्हाळप्पा सुरवसे, सुनील भीमाशंकर पुजारी, दीपक जयराम मेश्राम आणि अभिषेक गणेश माने या आरोपींना न्यायालयाने शुक्रवारी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर आता शरणू हांडे अपहरण प्रकरणात आणखी दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
राकेश भीमाशंकर कुदरे, श्रीकांत बाबुराव सुरपुरे या दोन संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांना कर्नाटकातील इंडी तालुक्यातून ताब्यात घेतले आहे. आमदार गोपीचंद पडळकर समर्थक शरणू हांडेचे अपहरण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 4 आरोपींनी आधी पोलिसांनी अटक केले होते. आरोपी अमित सुरवसेसह 4 आरोपींना काल न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर काल रात्रीच्या सुमारास सोलापूर पोलीसांनी आणखी दोन संशयिताना ताब्यात घेतले. या दोन्ही संशयितांचा गुन्ह्यात सहभाग होता? याची तपासणी करून अटकेची कायदेशीर कारवाई पूर्ण केली जाणार आहे
नेमकं प्रकरण काय?
गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या कार्यकर्त्यातं फिल्मी स्टाईल अपहरण झाल्याची घटना समोर आली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करुन हत्येचा प्रयत्न केल्याची माहितीही आहे. अपहरणची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांचे 4 पथक तात्काळ शोधासाठी रवाना करण्यात आले होते. काल रात्री 10 च्या सुमारास अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शरणु हांडे (Gopichand Padalkar Worker Sharnu Hande) असे अपहरण झालेल्या गोपीचंद पडळकर समर्थकाचे नाव आहेत. तर अमित सुरवसे असे अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या कार्यकर्त्याची भेट पडळकर यांनी घेतली, यावेळी कार्यकर्त्यांने काय घडलं याबाबतची माहिती त्यांना दिली. यावेळी त्यांनी रोहित पवारांचं देखील नाव घेतलं आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
रोहित पवार म्हणाले, आरोप तर ते करणारच. आज सरकारच्या विरोधात मी मोठ्या प्रमाणावर बोलतो आहे. पुराव्यासहित मी त्यांच्याविरोधात बोलतो आहे. सरकारची मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे आणि ती मी केलेली आहे. काल मी फोन केला असं ते म्हणतात, मी काल छत्रपती संभाजीनगरला होतो, त्यानंतर वाशिमला आलो, आज अमरावतीला आलो आहे. मी अजून कुठे कोणाशी फोनवर बोललेलो नाही, व्हिडिओ कॉलवर मी त्या कार्यकर्त्याला बोललो असतो ते म्हणाले, मी माझ्या घरच्यांशीच व्हिडिओ कॉलवर बोलत नाही तर हा कोण लागून गेला आहे, याच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलायला, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे. राहिला प्रश्न तो ज्या कार्यकर्ता, ज्याने ही चूक केली आहे त्याचा, जो व्यक्ती कायदा सुव्यवस्था हातात घेतो, त्याच्या बाजूने आम्ही राहत नाही. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, तुमच्याकडे पोलीस प्रशासन आहे, तुमच्याकडे गृहमंत्री आहे. गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच पडळकर तिकडे गेले आहेत आणि तिकडे जाऊन हा तमाशा तिथं करून मला अडकवण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर एसआयटी चौकशी करा, याची मी मागणी करतो. चौकशी करा खरं काय ते लोकांसमोर आलं पाहिजे. उगाच एखाद्या विषयात कोणावर अन्याय झाला असेल, मारहाण झाली असेल तर माझी सहानभूती त्या मुलाबरोबर आहे, त्या कार्यकर्त्या बरोबर आहे. तो आमच्या विरोधातला असला तरी चालेल. विषय एवढाच आहे की, जर खोटं बोलून कोणी वेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असेल, कोणी किती प्रयत्न केला तरी मला फ्रेम करू शकत नाही. कारण मी यामध्ये काही चुकी केली नाही. मी सरकारच्या विरोधात बोलतच राहणार. तुम्हाला जे काही एसआयटी चौकशी करायची करा. पण कालच्या प्रकरणांमध्ये उगाचच माझं नाव तिथे घेत आहात. ते योग्य नाही. राजकारणाला एवढ्या खालच्या लेवलला तुम्हाला न्यायचं असेल तर तो तुम्ही प्रयत्न करा. आम्ही लोकांच्या बाजूने, महाराष्ट्राच्या बाजूने लढत राहणार असेही पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.