मोठी बातमी! सोलापूर महापालिकेसाठी मविआचा फॉर्म्युला निश्चित; काँग्रेसला 45 जागा, शिवसेनेत वाद

सोलापूर : एकीकडे भाजप आणि शिवसेना युतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असतानाच सोलापुरात (Solapur) महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जागावाटपाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपला रोखण्यासाठी इथे मविआतील राजकीय पक्ष मनसेसह एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील (MVA) काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट, माकप ह्या सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येऊन सोलापूर महापालिकेच्या जागावाटपाबाबत घोषणा केली. त्यामळे, सोलापुरात भाजप-शिवसेना युती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. सोलापुरातील महापालिकेच्या 102 जागांसाठी हे जागावाटप निश्चित झालं असून 45 जागांसह काँग्रेस (Cogress) मोठा भाऊ ठरला आहे.

सोलापूर महापालिका भाजप विरोधात सर्वजण एकत्रित कॉमन मिनिमन प्रोग्राम घेऊन आलोय, सर्वच पक्षांनी यामध्ये त्याग केला आहे. केवळ भाजपला हरवण्यासाठी आम्ही आघाडी केलीय. आम्ही सर्व 102 जागा एकत्रित लढत असून मनसे देखील सोबत आहेत. काँग्रेस-45, शिवसेना उद्धव ठाकरे-30, राष्ट्रवादी शरद पवार गट-20 आणि माकप-7 असा हा फॉर्म्युला निश्चित केल्याचे शिवसेना शहर प्रमुख अजय दासरी यांनी सांगितले. तसेच, 4 तारखेला सोलापुरात प्राचारचा नारळ आम्ही फोडणार आहोत. खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, नरसय्या आडम मास्तर , खासदार ओमराजे निंबाळकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे हे नेते प्रचाराच्या शुभारंभास उपस्थित असतील, असेही दासरी यांनी सांगितले.

जागावाटपानंतर शिवसेना पक्षात वाद

महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला ठाकरे गटापेक्षा जास्त जागा आल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे उत्तर विधानसभा शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी शहरप्रमुख अजय दासरी यांना याबाबत जाब विचारला. आघाडीची पत्रकार परिषद सुरु होण्याआधी आणि पत्रकार परिषद संपल्यानंतर देखील शिवसैनिकांनी शहर प्रमुख अजय दासरी यांच्याकडे कमी जागा आल्याने नाराजी व्यक्त करत जाब विचारला. महेश धाराशिवकर आणि अजय दासरी यांच्यात शाब्दिक बचाबाची झाली असून एकमेकांना बघून घेण्याची भाषा या दोन्ही नेत्यांनी केल्याने काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सोलापुरात महाविकास आघाडीची घोषणा झाली असली तर पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले असून आता बंडखोरी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आम्ही आप आणि वंचितला सोबत येण्याचे आवाहन केलं होतं. पण, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, असे माजी आमदार नरसय्या आडम यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपानंतर बोलताना म्हटले.

मनसेला शिवसेनेच्या कोट्यातून जागा

जागावाटप करताना आम्ही सर्व पक्ष दोन-दोन पाऊले मागे आलोय. निवडून येण्याच्या निकष ठेवून आम्ही आघाडी केली आहे, मनसेला शिवसेनाच्या वाट्यातून ह्या जागा देणारं आहोत, मनसेची मागणी 5 जागांसाठी आहे. पण आम्ही आमच्या कोट्यातून त्यांना जागा देऊ, आम्ही समन्वयाने तो प्रश्न सोडवू. आघाडी करायची म्हटल्यावर आणि इच्छुक जागा असल्याने काही वाद होतात, आमचा अंतर्गत विषय आहे तो सोडवू, असे ठाकरे गटांच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी म्हटले.

माजी महापौरांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटातील दोन माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात दाखल झाले आहेत. माजी महापौर यू.एन.बेरिया आणि माजी महापौर नलिनी चंदेले या दोघांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थितीमध्ये बेरिया आणि चंदेले या दोघांचा प्रवेश झाला.

हेही वाचा

मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीची 100 जणांची यादी, घरातील तिघांना उमेदवारी; सना मलिक यांनी सगळंच सांगितलं

आणखी वाचा

Comments are closed.