नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं, सोलापूरात गोरे Vs मोहिते पाटील यांच्यात कडवी लढत, पालकमंत्र्य
सोलापूर : बुधवारी (4 नोव्हेंबर) जाहीर झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू होऊ लागलीय. प्रत्येक पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागला आहे. सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील असाच सामना पाहायला मिळणार आहे. (Muncipal Corporation Election 2025)
माढा लोकसभेत विजय मिळविल्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात तब्बल सहा आमदार महाविकास आघाडीचे निवडून आणून आपली ताकद दाखवून दिली होती. यामध्ये माळशिरस, माढा, करमाळा, मोहोळ या चार मतदारसंघात त्यांच्या पवार गटाचे तर सांगोल्यात शेतकरी कामगार पक्ष आणि बार्शीत उभाठा गटाचा आमदार निवडून आणला.आता काल घोषित झालेल्या 11 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी ही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जोरदार बांधणीला सुरुवात केली आहे.
या 6 नगरपालिकांसाठी मोर्चेबांधणी
आता खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा स्वतःचा बालेकिल्ला असलेला अकलूजसह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा,करमाळा , कुर्डूवाडी आणि मोहोळ या 6 नगरपालिका जिंकण्यासाठी बांधणी सुरुवात केली आहे. यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या जोडीला आमदार अभिजीत पाटील, आमदार नारायण पाटील, आमदार उत्तमराव जानकर, आमदार राजीव खरे या शरद पवार गटाच्या आमदारांसोबत शेकाप आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि उबाठा गटाचे आमदार दिलीप सोपल हेही आपली ताकद महाविकास आघाडीसाठी लावताना दिसत आहे.
जयकुमार गोरेंचं समीकरण कसं राहणार ?
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निवडणुकांपूर्वी तीन माजी आमदारांना भाजपमध्ये घेत ताकद वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासोबत सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे आणि दिलीप माने हेही प्रवेशाच्या तयारीत असून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत हेही संपूर्ण जिल्ह्यातला गट घेऊन भाजपमध्ये सामील होण्याच्या तयारीत आहेत. या निवडणुकीत खरा सामना हा पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातच रंगणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासाठी या प्रतिष्ठेच्या निवडणूक असणार आहे. आता जिल्ह्यांतर्गत कोण कोणाशी युती करणार आणि कोण कोणत्या पक्षात जाणार यावर पुढील समीकरणे ठरणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं
राज्यात 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे (दिनेश वाघमारे) यांनी याबाबतची घोषणा केली. त्यामुळे पुढील 1 महिन्यात नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम संपुष्टात येणार असल्याचे दिसून येते. 10 नोव्हेंबरपासून उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा लागणार आहे. त्यामुळे, राजकीय पक्षांना पुढील 8 दिवसांत उमेदवारांची नावे निश्चित करावी लागणार आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.