धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले
सोलापूर : प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मोबाईलवर शूटिंग करण्यावरून 12 वीच्या दोन विद्यार्थ्यात वाद होऊन मित्रानेच मित्राला चाकूने भोसकल्याचा धक्कादायक प्रकार सांगोल्यातून (solapur) समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून आरोपींना 7 दिवसांची पोलीस (Police) कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्याला सांगली येथे उपचारासाठी हलविण्यात आले. सांगोला तालुक्यातील कोळे येथे प्रजासत्ताकदिनी कार्यक्रम संपल्यानंतर हा धक्कादायक प्रकार घडला.
मोबाईलवर चित्रीकरणाच्या कारणावरून दोन जिवलग विद्यार्थी मित्रांमध्ये झालेल्या वादातून एका मित्राने आपल्याच विद्यार्थी मित्राच्या पोटात चाकूने भोसकून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थ्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याच्या पोटात चाकू तसाच ठेवून दोघांनी तेथून धूम ठोकली.दरम्यान जखमी विद्यार्थ्यावर सांगली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना सोमवारी प्रजासत्ताक दिनी सकाळी 9 च्या सुमारास शाळेच्या गेटसमोर घडल्याने विद्यार्थ्यांमधून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. युवराज सुभाष आलदर (वय -१९ रा. कोळे नाथबाबा वस्ती ता. सांगोला ) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत, वडील सुभाष सदा आलदर यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी शंकर मारुती घाडगे ( रा. कोळे ) समाधान श्रीमंत होनमाने (रा. जुनोनी ता सांगोला ) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी दोघांना शिताफीने अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना सात दिवसाची पोलीस कोठडी दिल्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांनी सांगितले आहे. फिर्यादी, सुभाष आलदर यांचा मुलगा युवराज व त्याचा मित्र शंकर घाडगे हे दोघेही बारावीच्या एकाच वर्गात शिक्षण घेतात. युवराज हा प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता शाळेवर आला होता . यावेळी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थी – विद्यार्थिनी शाळेच्या गेटमधून आपापल्या घराकडे निघाले होते . अचानक शंकर याने शाळाबाह्य समाधान होनमाने यास बोलवून युवराज यास शिवीगाळ दमदाटी करुन’ तू मोबाईलवर कोणाचे चित्रीकरण केले ‘ याचा जाब विचारत सोबत आणलेला चाकू दोघांनी मिळून युवराज याच्या पोटात भोसकून त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी युवराज याच्या पोटात भोसकलेल्या चाकूसह त्यास तातडीने उपचारा करता सांगली येथील खाजगी रुग्णालयात हलवले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी करीत असून प्रजासत्ताक दिनीच घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे मुलांमध्ये मात्र घबराटीचे वातावरण आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.