कंडोम, साडी, फटाक्यांची माळ, ट्रायपॉड जप्त; शरणू हांडे प्रकरणी आरोपींकडे असं साहित्य कशासाठी?
सोलापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) आणि आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांमधील वाद टोकाला पोहोचला असून काही दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीची व बदनामीचा बदला घेण्यासाठी रोहित पवार समर्थकांनी शरणू हांडेंचं अपहरण करत मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत माहिती मिळताच सोलापूर (Solapur) पोलिसांनी तात्काळ 4 पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केली, त्यानंतर आरोपींना अटक करुन न्यायालयातही हजर करण्यात आले. मात्र, आरोपींकडून साडी, फटाक्यांची माळ, कंडोम आणि ट्रायपॉड असं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. त्यामुळे, आरोपींकडून जप्त करण्यात आलेलं साहित्य नेमकं कशासाठी होतं असा प्रश्न अनेकांना व पोलिसांनाही पडला आहे. मात्र, यामागे मे महिन्यात झालेल्या मारहाणीचा, व्हिडिओतून झालेल्या बदनामीचा बदला घेण्याची भावना होती.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक करणाऱ्या रोहित पवारांच्या समर्थकास पडळकरांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केल्याची घटना मे महिन्यात घडली होती. विशेष म्हणजे या मारहाणीचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरलही करण्यात आला होता. यापुढे पडळकरांच्या विरोधात काही कृत्य केल्यास त्याला अशाचप्रकारे धडा शिकवला जाईल, अशी धमकीही दिली होती. या घटनेमुळे पवार समर्थकांची मोठी बदनामी झाली, पण कुठलीही पोलीस तक्रार न करता, त्यांनीही जशास तसे उत्तर देण्याचं मनाशी ठरवलं होतं. त्यातूनच, मारहाण करणाऱ्या शरणू हांडेचे अपहरण करुन रोहित पवारांच्या समर्थकांनी मारहाण करत व्हिडिओ बनविण्याचा प्लॅन आखला होता.
शरणू हांडेप्रकरणात पोलिसांनी विविध वस्तू पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून साडी, ट्रायपॉड, फटाक्यांची माळ आणि कंडोमची पाकिटेही जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे, आरोपींचा नेमका काय प्लॅन होता, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, ज्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओतून रोहित पवार समर्थकांची बदनामी करण्यात आली होती, त्याचप्रमाणे पडळकर समर्थकांची बदनामी करायची होती का?. व्हिडिओ बनवून तो व्हायरल करायचा असल्यानेच ट्रायपॉडसह, साडी अन् कंडोमची पाकिटेही आरोपींकडे आढळून आल्याची सूत्रांची माहिती आहे. अपमानाचा बदला अपमानाने घेण्याच्या सूडबुद्धीने अमित याने शरणूला साडी नेसवून, त्याचे केस कापून तसेच फटाके फोडून त्रास देणे आणि या सगळ्याचा व्हिडिओ करून अपमानाचा बदला अपमानाने घ्यावा, असा तर हेतू नव्हता ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. अर्थात या प्रकरणात पोलीसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी
सोलापुरातील गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे अपहरण व मारहाण प्रकरणातील चारही आरोपीना पोलिसांनी न्यायालयात केले असता, न्यायाने आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाच्या अधिकचा तपासासाठी पोलिसांनी आरोपीच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची केली मागणी होती. मात्र, पोलीस कोठडीच्या मागणीला आरोपीचे वकील अॅड.शरद पाटील यांनी युक्तिवाद करत विरोध केला. आरोपीकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने पोलीस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी द्यायची विनंती केली होती. दोन्ही बाजूचे युक्तिवाद न्यायमूर्ती वी.ए.कुलकर्णी यांनी ऐकून घेतले. त्यानंतर, आरोपी अमित सुरवसे, सुनील पूजारी, दीपक मेश्राम आणि अभिषेक माने या चौघाना 4 दिवसाची पोलीस सुनावण्यात आली असून याप्रकरणी पुढील सुनावणी 12 ऑगस्ट रोजी होणार आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.