भरधाव ट्रकने चार ते पाच दुचाकींना दिली धडक; प्रसंगावधान राखत दुचाकीस्वारांनी उड्या घेतल्याने जीवितहानी टळली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वणी तालुक्यातील चिखलगाव रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे गेट बंद असताना वाहनांच्या गर्दीत भरधाव ट्रक घुसल्याने थरारक घटना घडली. ट्रकने चार ते पाच दुचाकींना धडक देत त्यांचे नुकसान केले. सुदैवाने दुचाकीस्वारांनी प्रसंगावधान राखत ट्रक येत असल्याचे लक्षात येताच दुचाकींवरून उड्या घेतल्याने मोठी जीवितहानी टळली.

रेल्वे गेट बंद असल्याने क्रॉसिंगच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक दुचाकीस्वार गेट उघडण्याची प्रतीक्षा करीत होते. त्याचवेळी अचानक भरधाव ट्रक तेथे आला आणि समोर उभ्या असलेल्या दुचाकींना धडक देत पुढे गेला. काही क्षणांत घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याला वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवता आले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे.

ट्रक भरधाव वेगाने येत असल्याचे लक्षात येताच काही दुचाकीस्वारांनी प्रसंगावधान राखत आपल्या दुचाकींवरून बाजूला उड्या घेतल्या. त्यामुळे काही क्षणांत घडलेल्या या थरारक घटनेत मोठी जीवितहानी टळली. मात्र, चार ते पाच दुचाकींचे नुकसान झाले. चिखलगाव रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे गेट बंद झाल्यानंतर दोन्ही बाजूंना वाहनांची मोठी गर्दी होते. अशा वेळी वाहनांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक वाहतूक नियमनाची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले. या घटनेत काही सेकंदांचा विलंब झाला असता तर परिस्थिती गंभीर होऊ शकली असती. त्यामुळे रेल्वे गेट बंद असताना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments are closed.