SRH vs DC: दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचा खलनायक कोण? हातातून सामना…
आयपीएल 2026 मध्ये (IPL) दिल्ली कॅपिटल्सला आणखी एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. हंगामाच्या सुरुवातीला दमदार कामगिरी करणाऱ्या दिल्लीच्या संघाचा आत्मविश्वास आता डळमळीत झाल्याचे दिसत आहे. प्लेऑफच्या शर्यतीची वेळ जवळ येत असताना संघाची ही घसरण चिंता वाढवणारी ठरत आहे. हैदराबाद विरुद्धच्या पराभवासाठी जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत असून, यावेळी सर्व बोटे डेविड मिलरकडे वळताना दिसत आहेत.
सनराइजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दिल्लीला 47 धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 2 गडी गमावत तब्बल 242 धावांचा डोंगर उभा केला. या भल्या मोठ्या धावसंख्येत अभिषेक शर्माच्या तुफानी शतकाचा मोठा वाटा होता. त्याने केवळ 68 चेंडूंमध्ये 135 धावांची स्फोटक खेळी करत 10 चौकार आणि 10 षटकार लगावले. विशेष म्हणजे, अभिषेक वगळता हैदराबादच्या इतर कोणत्याही फलंदाजाला अर्धशतक गाठता आले नाही.
प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर पथुम निसंका अवघ्या 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि नितीश राणा यांनी चांगली भागीदारी करत संघाला सामन्यात टिकवून ठेवले. मात्र, अपेक्षांचा डोंगर असलेला डेविड मिलर पुन्हा एकदा अपयशी ठरला.
मिलर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला तेव्हा दिल्लीचा डाव अजूनही स्थिर होता. मात्र, तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. 10व्या षटकात केएल राहुल बाद झाल्यानंतर 11व्या षटकात नितीश राणाने अर्धशतक पूर्ण केले, पण लगेचच तोही बाद झाला. त्यानंतर लगेचच आलेल्या मिलरने पहिल्याच चेंडूवर विकेट गमावली. त्यामुळे 107/1 अशी मजबूत स्थिती असलेला दिल्लीचा स्कोअर क्षणार्धात 107/4 असा झाला आणि सामन्याची दिशा बदलली.
याआधीही मिलर निर्णायक क्षणी अपयशी ठरला होता. एका सामन्यात शेवटच्या दोन चेंडूंवर दोन धावा काढण्यात तो अपयशी ठरला होता. सलग दोन सामन्यांतील त्याच्या अपयशामुळे दिल्ली कॅपिटल्सला मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्यामुळे सध्या तरी संघाच्या या पराभवाचा विलेन म्हणून डेविड मिलरकडेच पाहिले जात आहे.
Comments are closed.