वैध मापन शास्त्र विभागात काम डोंगराएवढं, पण अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तुटवडा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मापात झोल, वाढीव किंमत, दिशाभूल करणारी माहिती देऊन ग्राहकांची सर्रास होणारी आर्थिक फसवणूक रोखण्याचे काम वैध मापन शास्त्र विभागाकडे आहे. संपूर्ण राज्यात कामाचा हा डोंगर असताना ते काम करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ कमी पडत असल्याने या विभागाची दमछाक होत आहे.

परिस्थितीचा गैरफायदा उचलत अनेक विक्रेते मापात झोल करत आपल्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांची फसवणूक करतात. तसेच अनेक उत्पादक आवेष्टित वस्तूंवर आवश्यक माहिती न छापता मनमानीपणे ग्राहकांना वस्तू, खाद्यपदार्थ, थंड पेय आदींची चढय़ा किमतीत विक्री करून पैसा कमावतात. कायद्याने हा गुन्हा असूनही ग्राहकांची बिनधास्त आर्थिक फसवणूक केली जाते. त्यामुळे अशा मतलबी विक्रेते व उत्पादकांविरोधात कारवाई करण्याची जबाबदारी वैध मापन शास्त्र विभागाकडे आहे. संपूर्ण राज्यात या विभागाकडून मनमानी करणाऱ्या विक्रेते, उत्पादकांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. पण सद्यपरिस्थितीत कारवाया करताना या विभागाची दमछाक होत आहे. कारण त्यांच्याकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. आवश्यक पदे भरली जात नसल्याने अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांवर त्याचा अतिरिक्त ताण पडत असल्याचे वैध मापन विभागातील सूत्राकडून सांगण्यात येते.

नियंत्रकाचे मुख्य पद रिकामे

गेल्या कित्येक महिन्यांपासून वैध मापन शास्त्र विभागाच्या नियंत्रकाचे पद रिक्त आहे. सध्या एका आयएएस अधिकाऱ्याकडे नियंत्रकाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. शिवाय क्षेत्रिय अधिकाऱ्यांची 25 टक्के पदे रिक्त आहेत. जिल्हा पातळीवरील उपनियंत्रक अधिकाऱ्यांची 18 पदे भरण्यात आलेली नाहीत. सहनियंत्रक अमरावती हे पददेखील रिक्त आहे. शासनाने याची दखल घेऊन आवश्यक पदे भरावीत जेणेकरून पूर्ण क्षमतेने काम करता येईल असे विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

Comments are closed.