वैभव सूर्यवंशीने अवघे 3 सेकंद शिल्लक असताना घेतला रिव्ह्यू अन् मिळाली विकेट, व्हिडिओ पाहाच

वैभव सूर्यवंशीने रविवारी (30 ऑगस्ट) आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच वरिष्ठ पुरुष संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली. बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफी 2026च्या पहिल्या उपांत्य सामन्यादरम्यान ईस्ट झोनचा नियमित कर्णधार इशान किशनला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्यामुळे सेंट्रल झोनविरुद्धच्या या सामन्यात उपकर्णधार वैभवने ईस्ट झोनच्या कर्णधारपदाची जबाबदारी घेतली आणि बरोबरच महत्त्वाची विकेट घेण्यासाठी त्वरित डीआरएसही घेतला.

पहिल्या सत्रादरम्यान किशनच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले आणि 15 वर्षीय वैभवने नेतृत्व हाती घेतले. नेतृत्व हाती घेताच त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार सारखे वरिष्ठ खेळाडू त्याच्या नेतृत्वाखाली खेळत होते, हे पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होते.

वैभवने आपल्या पहिल्याच कार्यकाळात प्रभावी नेतृत्व केले. त्याने सामन्याच्या 40 व्या षटकात डिसिजन रिव्ह्यू सिस्टम (DRS) चा ताबडतोब निर्णय घेत संघाला महत्त्वाची विकेट मिळवण्यात मोलाची भुमिका पार पाडली.

सामन्याचे 40 वे षटक मुकेश कुमारने टाकले. तेव्हा सेंट्रल झोनचा विकेटकीपर-सलामीवीर आर्यन जुयाल 46 धावांवर खेळत होता. त्याने मुकेशच्या षटकातील दुसरा चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर ढकलला. तेव्हा ईस्ट झोनचा विकेटकीपर कुमार कुशाग्रने तो झेलला आणि बाकी खेळाडूंनी अपील केले, मात्र मैदानावरील पंचांनी ते फेटाळले.

वैभवने बाकी खेळाडूंना विचारले असता विकेट गेल्याचे निश्चित वाटले नाही, मात्र त्याने आपल्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवला आणि रिव्ह्यू घेतला.

रिप्ले पाहिले असता, चेंडू बॅटला लागल्याचे दिसते. कारण अल्ट्राएजने एक लहानसा स्पाइक दाखवला. त्यामुळे जुयाल बाद झाला. त्यानंतर ईस्ट झोनच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. 40 षटकानंतर सेंट्रल झोनने 4 विकेट्स गमावत 103 धावा केल्या होत्या.

वैभवचा हा दुसराच दुलीप ट्रॉफीचा सामना आणि दहावा प्रथम श्रेणीचा सामना आहे. त्याने 2024 च्या सुरूवातीला रणजी ट्रॉफीमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. (Stand-in Captain Vaibhav Sooryavanshi goes for review with 3 seconds remaining CZ vs EZ Semi-Final, Duleep Trophy 2026)

Comments are closed.