स्टोक्सची अचानक निवृत्ती
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या निर्णायक कसोटी मालिकेदरम्यान क्रिकेटविश्वाला जबरदस्त धक्का बसला आहे. इंग्लंडचा कर्णधार आणि आधुनिक क्रिकेटमधील सर्वात प्रभावी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा करत सर्वांनाच अचंबित केले आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेली तिसरी आणि अखेरची कसोटी हीच त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील अखेरची लढत ठरणार आहे.
तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात जीव ओतून खेळत असतानाच चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी स्टोक्सने निवृत्तीची घोषणा केली आणि संपूर्ण क्रिकेटविश्व काही काळ स्तब्ध झाले. या मालिकेपूर्वीच स्टोक्स वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. न्यूझीलंडविरुद्धची पहिली कसोटी जिंकल्यानंतर त्याने संघाचा नाइट कर्फ्यू मोडल्याची आणि नाइट क्लबमध्ये वाद घातल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन यांना विश्रांती देण्यात आली होती. तिसऱ्या कसोटीत पुनरागमन करताच स्टोक्सने थेट निवृत्ती जाहीर केल्याने चर्चाना आणखी उधाण आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ पोस्ट करत स्टोक्सला मानवंदना दिली. इंग्लंडच्या महान कर्णधारांपैकी एक, प्रेरणादायी नेता आणि अद्वितीय क्रिकेटपटू, अशा शब्दांत त्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
स्टोक्सची कारकीर्द ही इंग्लंड क्रिकेटच्या सुवर्णपानांवर कायम कोरली जाईल. तब्बल १५ वर्षे इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना त्याने चार वर्षे कर्णधारपदही भूषवले. २०१९ च्या विश्वचषक अंतिम फेरीतील त्याची नाबाद ८४ धावांची खेळी इंग्लंडला पहिल्यांदाच विश्वविजेते बनवणारी ठरली. त्याच वर्षी अॅ शेस मालिकेतील हेडिंग्ले कसोटीत केलेल्या नाबाद १३५ धावा क्रिकेट इतिहासातील महान खेळीपैकी एक मानल्या जातात. २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन येथे झळकवलेल्या २५८ धावा त्याच्या आक्रमक फलंदाजीचा सर्वोच्च नमुना ठरल्या.
Comments are closed.