आयर्लंडविरुद्ध टी 20 मालिका गमावल्यानंतर टीम इंडियासाठी दिलासादायक वृत्त! वेस्ट इंडिजमध्ये घडली चकित करणारी बाब

भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाचा २०२६ चा आयर्लंड दौरा कायम लक्षात राहील. हा दौरा भारतासाठी एका दु:खद स्वप्नापेक्षा काही कमी नव्हता. या दौऱ्यात खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेत भारत ०-२ ने पराभूत झाला. रविवारी (२८ जून) भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी निराशाजनक ठरला. पुरुष संघाचा आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात तर महिला संघ आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला. या पराभवांनंतर पुरुष संघासाठी दिलासादायक माहिती समोर येत आहे, जी वेस्ट इंडिजमध्ये घडली आहे.

ऍंटिग्वा येथे वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्या खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या निकालाने गुणतालिकेत पूर्णपणे बदल झाला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने शानदार कामगिरी केली आणि श्रीलंकेचा एक डाव आणि २१७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. श्रीलंकेच्या या पराभवाचा फायदा भारताला झाला आहे.

या कसोटीनंतर आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशीप २०२५-२७ च्या गुणतालिकेत श्रीलंकेला नुकसान झाले तर भारताला फायदा झाला आहे. भारत या गुणतालिकेत एका स्थानाने वर आला आहे.

ऍटिग्वा कसोटीमध्ये यजमान संघाचा कर्णधार रोस्टन चेजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे श्रीलंकेने पहिल्या डावात ३०८ धावा केल्या. त्याबदल्यात वेस्ट इंडिजने आमिर जांगूच्या ऐतिहासिक द्विशतक आणि चेजच्या धमाकेदार १९४ धावांच्या जोरावर पहिल्या डावात ९ विकेट्स गमावत ६२६ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा दुसरा डाव १०१ धावसंख्येवरच संपुष्टात आला. हा विजय वेस्ट इंडिजचा आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशीप २०२५-२७ मधील पहिला विजय ठरला.

आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशीपमध्ये श्रीलंकेचा हा पहिलाच सहभाग आहे. त्यांनी आतापर्यंत तीन सामने खेळले असून एक सामना जिंकला, एक गमावला आणि एक सामना अनिर्णीत राखला. त्यामुळे आता ते ४४.४४ टक्केवारीसह सहाव्या स्थानावर आले आहेत. या पराभवाआधी त्यांचे तिसरे स्थान भक्कम होते, मात्र वेस्ट इंडिजविरुद्धचा कसोटी सामना गमावल्यानंतर त्यांच्या क्रमवारीत लक्षणीयरित्या घसरण झाली.

या गुणतालिकेत भारत सहाव्या स्थानावर होता, आता मात्र ते ४८.१५ च्या टक्केवारीने पाचव्या स्थानावर आले आहेत. वेस्ट इंडिज नऊ सामन्यांमथील पहिल्या विजयामुळे १४.८१ टक्केवारीने आठव्या स्थानावर आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया ८७.५० च्या प्रभावी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर कायम आहे. दुसऱ्या स्थानावर गतविजेता दक्षिण आफ्रिका आहे. तसेच तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंड असून सध्या त्यांचा इंग्लंडविरुद्ध तिसरा कसोटी सामना सुरू असून ते विजयाच्या मार्गावर आहेत. बांगलादेश चौथ्या स्थानावर आहे.

Comments are closed.