दुर्मिळ आजारावर मात करत विद्यार्थ्याने बारावीत मिळवले 73.33 टक्के गुण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दुर्मिळ आजाराशी झुंज देतही जिद्दीने शिक्षण पूर्ण करणाऱ्या जय हिंद कॉलेजच्या विद्यार्थ्याने यंदाच्या परीक्षेत 73.33 टक्के गुण मिळवले आहे. व्हिहान जैन असे या विद्यार्थ्याचे नाव असून, त्याच्या यशामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. टाइम्स ऑफ इंडियाे याबाबत वृत्त दिले आहे.

व्हिहानला ड्युशेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी (Duchenne Muscular Dystrophy) हा दुर्मिळ आनुवंशिक आजार आहे. या आजारामुळे त्याची शारीरिक हालचाल मर्यादित झाली असून, वयाच्या 15व्या वर्षी त्याला चालताही येत नाहिये. मात्र या सर्व अडचणींवर मात करून त्याने हार न मानता अभ्यासात सातत्य ठेवले.

व्हिहानचे वडील सुनील जैन सांगतात, “तो कधीही चिंताग्रस्त नसतो. आमच्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. परीक्षेच्या काळात आम्ही पालक म्हणून चिंतेत होतो, पण तो मात्र पूर्णपणे शांत होता.” त्याचा सकारात्मक दृष्टिकोन संपूर्ण कुटुंबासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

व्हिहान आपल्या यशाचे श्रेय आपल्या पालकांना देतो. शारीरिक अडचणी असूनही शिक्षण थांबू नये यासाठी पालकांनी घेतलेली मेहनत त्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असल्याचे तो सांगतो. भविष्यात ग्राफिक्स आणि अ‍ॅनिमेशन या क्षेत्रात करिअर करण्याची त्याची इच्छा आहे. आपल्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी हे क्षेत्र योग्य असल्याचे त्याचे मत आहे.

व्हिहानच्या क्षमतेबद्दल त्याचे वडीलही अत्यंत आशावादी आहेत. “त्याची बुद्धी खूप तीक्ष्ण आहे. तो गोष्टी खूप लवकर समजून घेतो,” असे ते म्हणाले. शैक्षणिक यशाबरोबरच व्हिहानला वाचनाचीही आवड आहे. तो अनेक कथा वाचतो आणि स्वतःही मोबाईलवर कथा लिहितो. मात्र त्या कथा तो अजूनपर्यंत कुणालाही दाखवत नाही, असे त्याचे वडील सांगतात.

Comments are closed.