अजितदादा असते तर राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत सध्या कोणतीही अधिपृत चर्चा नाही; पण अजितदादा असते तर राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते, असे सांगत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ऐन दिवाळीत पुन्हा एकदा चर्चेची राळ उडवून दिली आहे.

अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी गुरुवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शरद पवार आपण 10 तारखेनंतर एकत्र बसू, असे प्रफुल पटेल यांच्याशी बोलत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. त्याचदरम्यान सुनील तटकरे यांनी, आज अजितदादा हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र दिसले असते, असं म्हटलं आहे. अजितदादांच्या प्रखर इच्छाशक्तीमुळे विलीनीकरण पूर्णत्वास गेले असते; परंतु त्यांच्या अपघाती निधनामुळे तो विषय त्या ठिकाणीच थांबल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

12 फेब्रुवारी ही तारीख निश्चित होती

अजितदादा हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा  नक्की झाली होती. मी त्यांचा जवळचा सहकारी असल्याने हा विषय मला माहीत होता. विलीनीकरण कसे होणार तेदेखील ठरले होते. 12 फेब्रुवारी ही तारीख निश्चित झाली होती, असे सुनील तटकरे म्हणाले.

पक्ष मजबुतीसाठी एकत्र येणे अपेक्षित होते – शशिकांत शिंदे

तटकरेंनी सत्य परिस्थिती सांगितली. अजित पवार असताना विलीनीकरणाची चर्चा झाली होती. आज दोन्ही पक्ष एकत्र असते तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, महानगरपालिका वगैरेंचे चित्र वेगळे दिसले असते. पक्ष मजबुतीने ताकदीने उभा राहण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात हे शरद पवार आणि अजित पवारांना अपेक्षित होते. त्यादृष्टीनेच विलीनीकरणाची चर्चा झाली होती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले.

शरद पवारांची प्रकृती उत्तम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत असून त्यांना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

Comments are closed.