टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संघातून वगळल्याबद्दल पहिल्यांदाच बोलला सूर्या! म्हणाला “हे कसे शक्य आहे आणि श्रेयस…”

भारताने 2026 मध्ये सलग दुसऱ्यांदा टी 20 विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली. संघाने मायदेशात वर्षाच्या सुरूवातीला सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ही विलक्षण कामगिरी केली, मात्र स्पर्धा जिंकल्यानंतर लगेचच त्याला संघातून वगळण्यात आले. याबद्दल त्याने आपले मौन सोडले आहे.
सूर्यकुमारला संघातून वगळल्यानंतर अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीने आर्यलंड आणि इंग्लंड दौऱ्यांसाठी श्रेयस अय्यर याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते, मात्र सूर्यकुमारला संघाबाहेर काढण्यामागचे मोठे कारण त्याची वैयक्तिक कामगिरी होती. गेल्या दोन वर्षांत त्याच्या फलंदाजीचा फॉर्म खूपच खालावला होता.
सूर्यकुमारला 2025 मध्ये भारताकडून एकदाही अर्धशतकी खेळी करता आली नाही. तसेच टी 20 विश्वचषकात एकदाच त्याने मोठी खेळी केली होती. वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात भारताच्या माजी कर्णधाराने नाबाद 84 धावांची खेळी केली होती.
सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने एकही मालिका गमावली नव्हती आणि शेवटी टी 20 विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली. संघातून वगळल्यानंतर सूर्यकुमारने मान्या केले की, सुरूवातीची प्रतिक्रिया नाराजीची नव्हती, कारण त्याने स्वत:ला निवड समितीच्या जागी ठेवून परिस्थिती समजण्याचा प्रयत्न केला.
सूर्यकुमारने संघात त्याचे नाव नव्हते याबद्दल म्हटले, जेव्हा माझे नाव नव्हते, तेव्हा मी हसलो. कारण संघासोबत मी एक-दोन वर्ष क्रिकेट खेळलो आणि जेव्हा कधी मी खेळतो, तेव्हा कधी दबाव असतो, गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, अशा स्थितीत मी नेहमीच हसलो आहे. मी निश्चित राहिलो आहे. भूतकाळात जेव्हा मला चांगली कामगिरी करण्याची संधी मिळाली, तेव्हा मी कृतज्ञ राहिलो आहे.
आता जी परिस्थिती निर्माण होईल, असे मलाही वाटले नव्हते. 2026 मध्ये मला वाटले होते की, पुढे मी या संघाला आणखी दोन वर्षे पुढे घेऊन जाईल. ऑलिम्पिक स्पर्धा आणि त्यानंतर आणखी एक टी 20 विश्वचषक असेल. पण त्याच वेळी समोरची व्यक्ती काय विचार करत आहे आणि तुमचे विचार या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी आपल्या विचारांनुसार निर्णय घेतला, जो त्यांना योग्य वाटला आणि मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पुढे जाऊन हा संघ दुसऱ्या कोणाच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करत असेल तर मला काही हरकत नाही, असे सूर्यकुमारने भारताचे माजी फलंदाज आकाश चौप्रा यांच्या युट्यूब चॅनेलवर म्हटले आहे.
सूर्यकुमारने आगरकरांनी घेतलेला निर्णय त्याला जड गेला, हे मान्य केले आहे. त्याबद्दल तो म्हणाला, त्यांनी निवडलेला संघ मी पाहिला आहे. मी श्रेयससोबत खूप क्रिकेट खेळलो आहे. आणि मला माहित आहे की तो एक चांगला खेळाडू, एक चांगला माणूस आणि एक चांगला कर्णधारसुद्धा आहे. त्यामुळे, ‘त्यांनी त्याला कर्णधार का बनवले?’ असा प्रश्न मला पडला नाही. पण हो, मी थोडा निराश झालो होतो. कारण तुम्ही दोन वर्षांत एकही मालिका हरलेली नाही. तुम्ही विश्वचषक आणि आशिया कप जिंकला आहे. मग तुम्हाला हेच पुढेही चालू राहावे असे वाटते. कारण जेव्हा सर्व काही सुरळीत चालले आहे, तेव्हा हा बदल का? या बदलाचे कारण काय? हे माझ्या मनात घोळत होते. मी दीड महिना घरी बसून होतो.”
संघ जाहीर करण्याच्या 2-3 दिवसांआधी त्यांनी मला कॉल केला होता आणि आता पुढे जाण्याची वेळ आली आहे, असे सांगितले. त्यावर मी कोणतीच रिऍक्शन दिली नाही. कारण माझे काहीच चुकले नव्हते. स्काय कधीही असा वागला नाही. कोणीही तो कॉल घेतला असता, तरी त्याला वाटले असते तो निर्णय संघासाठी योग्य आहे. भविष्यात तो निर्णय चांगला आहे. तुम्ही तो कॉल स्वीकारला, तुम्ही मला सांगितले. काही अडचण नाही, असेही सूर्यकुमारने पुढे म्हटले आहे.
“मी खूप मेहनत घेत आहे आणि माझ्याकडून शक्य असलेले सर्वकाही करत आहे. तुम्ही मला कधीही बोलावू शकता. मी कधीही क्रिकेट खेळत असतो. मी खेळत राहीन. जर सर्व काही व्यवस्थित झाले, तर गोष्टी योग्य प्रकारे घडतील,” असेही सूर्यकुमार म्हणाला.
श्रेयसच्या नेतृत्वाखाली भारताच्या कामगिरीची सुरूवात निराशाजनक झाली. संघाने आयर्लंड दौऱ्यातील टी 20 मालिका 0-2 अशी गमावली. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यातही संघाचा 0-4 असा पराभव झाला.
Comments are closed.