हार्दिक पंडय़ा जायबंदी; मुंबईकर सूर्यांश शेडगेला संधी, वन-डे मालिकेसाठी हिंदुस्थान ‘अ’ संघाची घोषणा
दुखापतीमुळे हार्दिक पंडय़ाच्या पुनरागमनाला पुन्हा ब्रेक लागला असून, ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेसाठी त्याच्या जागी सूर्यांश शेडगे याची हिंदुस्थान ‘अ’ संघात निवड करण्यात आली आहे. हार्दिक गोलंदाजी करताना अद्याप वेदनामुक्त नसल्याचे समोर आल्याने त्याचे मैदानावरील पुनरागमन लांबले आहे.
23 वर्षीय सूर्यांश शेडगे हा मध्यमगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने हिंदुस्थानसाठी तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, 15 ‘लिस्ट ए’ सामन्यांपैकी जवळपास निम्मे सामने हिंदुस्थान ‘अ’कडून खेळले आहेत. जूनमध्ये श्रीलंका ‘अ’विरुद्ध त्याने केवळ 66 चेंडूंत 72 धावांची कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली होती.
हार्दिक मार्च 2025 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर वन-डे सामना खेळलेला नाही. आयपीएल 2026 मध्ये मे महिन्यात झालेल्या दुखापतीनंतर त्याचे मैदानावरील पुनरागमन सातत्याने लांबत आहे. दरम्यान, टी-20 संघात निवड झालेल्या नमन धीरच्या जागी डावखुरा फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू अनुकूल रॉयचा हिंदुस्थान ‘अ’ संघात समावेश करण्यात आला आहे. नमन धीरने वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी वॉशिंग्टन सुंदरची जागा घेतली आहे. हिंदुस्थान ‘अ’चे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार असून, देवदत्त पडिक्कल उपकर्णधार असेल.
Comments are closed.