वैभव सूर्यवंशीच्या संभाव्य पदार्पणाची चर्चा; पण टीम इंडियाच्या कमकुवत बाजू झाल्या उघड!
भारतीय उपखंडातले खेळाडू विक्रमांसाठी खेळतात असं वक्तव्यं ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने केलं होतं. संघापेक्षा वैयक्तिक विक्रम महत्त्वाचे ठरतात असं हेडनला म्हणायचं होतं. हेडन यांचं वक्तव्य एका वेगळ्या परिप्रेक्ष्यात गेल्या काही दिवसात खरं ठरलं. १५वर्षीय वैभव सूर्यवंशीने यंदाचा आयपीएल हंगाम गाजवला. मोठमोठ्या गोलंदाजांना चौकार-षटकारांची लयलूट करत वैभवने ऑरेंज कॅप पटकावली. एका हंगामात सर्वाधिक षटकारांचा विक्रम त्याने नावावर केला. वैभवच्या बॅटस्विंगने अनेक माजी खेळाडू अवाक झाले. वैभवने त्याच्या दमदार कामगिरीसह आम्हाला त्याला संघात घेणं जवळपास भाग पाडलं अशा शब्दांत निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी भावना व्यक्त केल्या. भारतासाठी सगळ्यात लहान वयाचा क्रिकेटपटू ठरण्याचा मान वैभवला मिळणार अशी चर्चा सुरू झाली. आयर्लंडच्या छोटेखानी दौऱ्यात वैभव इतिहास घडवणार अशी चिन्हं होती.
आयर्लंडचे आंतरराष्ट्रीय संघाचा दौरा असला की बेलफास्ट इथल्या मॅलाहाईड पार्क इथे सामने आयोजित होतात. मात्र हा दौरा अगदी शेवटच्या क्षणी ठरला. त्यामुळे स्टॉरमंट क्लब इथे सामने खेळवण्याचा निर्णय झाला. बेलफास्टमधल्या मैदानाची क्षमता १५००० आहे. तिथे सामने झाले असते तर मोठ्या प्रमाणावर चाहत्यांना वैभव सूर्यवंशीचं पदार्पण याचि देही याचि डोळा अनुभवता आलं असतं. पण तसं झालं नाही. शाळकरी मुलगा आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार याची चर्चा आयर्लंडमध्ये होऊ लागली. फुटबॉल वर्ल्डकपचा ज्वर असतानाही वैभव सूर्यवंशी हे नाव आयर्लंडमधल्या क्रीडा वृत्तांकनाच्या केंद्रस्थानी आलं. वैभवचं आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा क्षण टिपण्यासाठी कॅमेरे सज्ज होते. मात्र सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाचे प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी वैभवचं पदार्पण लांबणीवर जाईल असे संकेत दिले. वैभवला अंतिम अकरात घ्यायचं तर टी२० वर्ल्डकपविजेत्या संघातील कोणाला तरी काढावं लागले. सध्या ते शक्य वाटत नाही असं कोटक म्हणाले.
शुक्रवारी श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणून पदार्पण केलं. त्यानेही कोटक यांचा मुद्दा उचलून धरला. टॉसवेळी श्रेयसने वैभव पदार्पण करणार नसल्याचं स्पष्ट केलं आणि सोशल मीडियावर नाराजीचा सूर उमटू लागला. आयर्लंडने भारतीय संघाविरुद्ध १८२ धावांची मजल मारली. आयपीएलमध्ये याच भारतीय खेळाडूंचा समावेश असलेले संघ १२० चेंडूत २००पेक्षा जास्त धावांचाही पाठलाग करत होते. मात्र आयपीएल आणि आयर्लंड हा फरक झाला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. पाटा खेळपट्टीवर खोऱ्याने धावा करणारे भारतीय फलंदाज या खेळपट्टीवर मात्र एकेक फटका लगावताना माघारी चालल्याचे चित्र पाहायला मिळालं.
गवत राखलेली खेळपट्टी, चेंडूला मिळणारा स्विंग, अतिरिक्त उसळी आणि काहीसं थंड वातावरण या नव्या वातावरणात भारतीय फलंदाज गडबडून गेले. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन या त्रिकुटाने आयपीएलच्या दोन महिन्यात धावांची टांकसाळच उघडली होती. मात्र आयर्लंडमध्ये त्यांनी लगावलेले फटके क्षेत्ररक्षकांच्या हातात जाऊन विसावताना दिसत होते. प्रत्येक चेंडूवर चौकार-षटकार लगावता येतो हा त्यांचा विश्वास साफ गळून गेला. खेळपट्टी पाटा नसेल तर लगावलेले फटके आत्मघातकी ठरू शकतात हे एव्हाना त्यांच्या लक्षात आलं असेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू भसकन आत येतो किंवा टप्पा पडून एकदम बाहेरच्या दिशेने जातो याचं काय करायचं हे त्यांना कळेना. उसळता चेंडू छातीचा वेध घेणारा असेल तर त्याच्यावर पूल किंवा हूकचा फटका मारणं माघारी धाडू शकतं हे एव्हाना त्यांना कळलं असेल. शालेय वयातल्या मुलाच्या पदार्पणाची चर्चा असताना टी२० वर्ल्डकपविजेत्या संघातले खेळाडू सपशेल लोटांगण घालत असल्याचं चित्र आहे.
भारतीय गोलंदाजांना धावा रोखणे आणि विकेट्स पटकावणं हेही अवघड जात असल्याचं स्पष्ट झालं. शुक्रवारी झालेल्या लढतीत प्रसिध कृष्णाच्या एका षटकात आयर्लंडच्या फलंदाजांनी २७ धावा कुटल्या. या षटकामुळेच आयर्लंडने मोठी धावसंख्या रचली. गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरवर संघव्यवस्थापनाचा तसंच कर्णधाराचा विश्वास नसल्याचंही स्पष्ट झालं. शुक्रवारी झालेल्या लढतीत वॉशिंग्टनने एक षटक टाकलं. फलंदाजीत तो सहाव्या क्रमांकावर आला. रविवारच्या लढतीत त्याला संघातून वगळण्यात आलं. प्रिन्स यादवने पदार्पणात तीन विकेट्स पटकावल्या. पण सूर्यांश शेडगे आणि अक्षर पटेल या दोघांनाही विकेट्स मिळवण्यात अपयश आलं. भारतीय खेळाडूंच्या तुलनेत आयर्लंड संघाकडे अतिशयट तुटपुंजा अनुभव होता. त्यांचे ५ प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकले नाहीत. या मालिकेसाठी तीन नव्या खेळाडूंची निवड केली. यापैकी एक मूळचा राजस्थानचा आहे. जय मुंद्राच्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांची फेफे उडाली. अचूक टप्प्यावरच्या शिस्तबद्ध गोलंदाजीचा सामना कसा करायचा याचं तंत्र भारतीय फलंदाजांकडे नसल्याचंही उघड झालं. आयपीएल स्पर्धेत उत्तम फॉर्मात असणारा श्रेयस अय्यर आयर्लंडमध्ये निरुत्तर ठरला. शिवम दुबे अद्यापही पूर्णांशाने फिनिशर म्हणून तयार झालेला नाही हे स्पष्ट झालं. धावा घेताना भारतीय खेळाडूंमधला आपापासतला समन्वायचा अभाव दिसला. एकेरी, दुहेरी धावा घेत इनिंग्ज कशी बांधावी याचा भारतीय फलंदाजांना विसर पडल्याचं चित्र दिसलं. गोलंदाजांना सन्मानही द्यायचा असतो ही गोष्ट भारतीय फलंदाजांच्या गावीही नसल्याचं स्पष्ट झालं. आयपीएलमध्ये अडीचशे धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय फलंदाजांची आयर्लंडमध्ये मात्र दीडशे धावा करतानाही दमछाक उडाली.
Comments are closed.