मोठी बातमी! Thailand Open 2026 च्या फायनलमध्ये सात्विक-चिराग यांची धमाकेदार एंट्री; हंगामात पहिल्यांदाच…
भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यांनी शनिवारी (१६ मे) झालेल्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या गोह सी फेई आणि नूर इझुद्दीन यांचा १९-२१, २२-२०, २१-१६ असा पराभव केला आहे. दुसरीकडे पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन हे दोघे शुक्रवारी (१५ मे) झालेल्या उपांत्यपूर्व फेरीतच स्पर्धेबाहेर झाले आहेत.
उपांत्य फेरीत पहिला गेम थोडक्यात गमावल्यानंतर भारतीय जोडीने दुसऱ्या गेममध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्यांनी महत्वाचे पाइंट्स वाचवले आणि तणावपूर्ण स्थितीत २२-२० ने तो गेम जिंकला. त्याच लयीत सात्विक आणि चिराग यांनी आक्रमक स्मॅश, अचूक नेट प्ले आणि उत्तम समन्वयाच्या जोरावर निर्णायक गेममध्ये वर्चस्व राखले आणि विजय निश्चित केला. हा सामना एक तास आणि २२ मिनिटे चालला. या हंगामातील पहिल्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर ५०० स्पर्धेच्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या अव्वल मानांकित भारतीय जोडीने मलेशिया विरुद्ध चांगली कामगिरी केली.
जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या गोह आणि इझुद्दीने यांनी या रोमांचक सामन्यातील पहिला गेम जिंकला. सामन्याच्या सुरूवातीलाच दोन्ही जोडीने ७-७ अशी निर्णायक आघाडी घेतली होती. त्यानंतर मलेशियाची जोडी १५-९ अशी पुढे होती, तेव्हा भारतीय जोडीने अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला, सात्विकने दोन गेम पॉइंट्स देखील वाचवले होते.
दुसरा गेम अटीतटीचा झाला, ज्यामध्ये भारतीय जोडीने संयम राखत विजय मिळवला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये ५-५ अशी बरोबरी साधल्यानंतर सात्विक-चिरागने सलग सहा पॉइंट्स मिळवले आणि आपली आघाडी १६-८ अशी वाढवली. मलेशियाच्या जोडीला ती आघाडी भरून काढता आली नाही आणि भारतीय जोडीने गेम जिंकत अंतिम फेरीत धडक मारली.
या भारतीय जोडीने जपानच्या ताकुमी नोपुरा आणि युइची शिमोगामी यांना ४१ मिनिटांतच २१-१२, २१-१३ असे पराभूत करत उपांत्य फेरीत धडक मारली होती. जागतिक क्रमवारीत ३४ व्या क्रमांकावर असलेली ही जपानी जोडी पहिल्यांदाच सात्विक-चिरागचा सामना करत होती. या गेममध्ये सुरूवातीपासूनच भारतीय जोडीने आपले नियंत्रण ठेवले होते. त्यांनी पहिल्याच गेममध्ये १०-० अशी जबरदस्त आघाडी घेतली. काही वेळानंतर जपानी जोडीने १०-१४ अशी आघाडी घेतली असली तरी भारतीय जोडीने पहिला गेम सहज जिंकला.
दुसरा गेम रोमांचक झाला, ज्यामध्ये जपानी जोडीने चांगला खेळ केला. सात्विक-चिरागने संयमाने खेळ करत हळूहळू आघाडी घेतली आणि सामना जिंकला. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेले सात्विक-चिराग यांनी शेवटचा अंतिम सामना २०२५ मध्ये चायना मास्टर्समध्ये खेळला होता. २०२४ मध्ये थायलंड ओपनचे विजेतेपद पटकावल्यानंतर आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या या भारतीय जोडीचा अंतिम सामना इंडोनेशियाची जोडी लिओ रॉली कार्नांडो आणि डॅनियल मार्थिन किंवा चीनची जोडी हे जी टिंग आणि रेन शियांग यू यांच्यापैकी एकाशी होईल.
या स्पर्धेतून बाकी भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहिली तर उपांत्यपूर्व फेरींमध्ये सिंधू जपानच्या अव्वल मानांकित अकाने यामागुचीकडून २१-१९, १८-२१, १५-२१ अशी पराभूत झाली. तसेच सेन स्थानिक खेळाडू कुनलावुत विटिडसार्नकडून १९-२१, १६-२१ असा पराभूत झाला.
Comments are closed.