ठाण्यात अल्पवयीन मुलाने भरधाव टेम्पो चालवत 2 रिक्षांना उडवलं! चालकाचा मृत्यू, तर 2 जण जखमी
ठाणे: ठाण्यात एका 15 वर्षांच्या मुलाने भरधाव टेम्पो चालवत 2 रिक्षांना धडक (Accident News) दिली. यात एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्या रिक्षातील 2 जण जखमी झाले आहेत. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील आनंद नगर परिसरात सोमवारी पहाटे पावणेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात 15 वर्षांचा एक अल्पवयीन मुलगा भरधाव वेगात पिकअप टेम्पो घेऊन निघाला असताना त्याने 2 रिक्षांना धडक दिली आणि नंतर रस्त्याच्या कडेला मेट्रोसाठी खोदलेल्या खड्ड्यात त्याचा टेम्पो जाऊन पडला.
त्यामुळे हा अल्पवयीन चालक देखील किरकोळ जखमी झाला. मात्र त्याने रिक्षांना दिलेली धडक इतकी जोरदार होती, की त्यात एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून या अपघाताप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी अल्पवयीन टेम्पो चालकासह त्याच्या वडिलांनाही ताब्यात घेतल्याची माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी दिली आहे.
टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अॅक्शन मोडवर
टोरेस घोटाळा प्रकरणी एकीकडे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. दुसरीकडे ठाणे पोलिसांनी देखील कारवाई सुरु केली आहे. भाईंदरमधील टोरेस कार्यालयाशी संबंधित तिघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्या तिघांना पोलीस स्टेशनला हजर केलं असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दुसरीकडे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अजूनही छापेमारी सुरु असल्याचं पाहायला मिळतं.
भाईंदर कार्यालयातील तिघांना अटक
भाईंदर येथील टोरेस कार्यालयात काम करणाऱ्या कॅशियर, मॅनेजर आणि ऑफिस भाड्याने जिच्या नावावर घेतले होते त्या महिलेला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. पोलिसांनी अटक करुन त्यांना ठाणे कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी लक्ष्मी सुरेश यादव वय वर्ष 23, राहणार ताडदेव फिश मार्केट, नितीन रमेश लखवानी वय वर्ष 47, राहणार खारोडी मालाड आणि मोहम्मद मोईजुद्दीन नझरुद्दीन खालिद शेख वय वर्ष 50, राहणार पूनम सागर मीरा रोड या तिघांना नवघर पोलिसानी अटक केली आहे.
टोरेसनं गेल्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी 2024 मध्ये दादरमध्ये पहिलं कार्यालय उघडलं होतं. त्यानंतर , गिरगाव, कांदिवली, कल्याण, सानपाडा, मीरा रोड मध्ये देखील कार्यालयं उघडली होती.
व्हीडीओ गेम पार्लरच्या जुगारावर कारवाई, गेम पार्लरचे साहित्य जप्त
वर्ध्याच्या हिंगणघाट येथे पोलिसांनी विडीओ गेम पार्लरवर छापा टाकत कारवाई केली आहे. हिंगणघाट शहरात सरकारी दवाखाना चौकात टीनाचे शटरच्या दुकानात इलेक्ट्रानीक कॉइन मशीनने जुगार खेळला जायचा. गुप्त माहितीवरून पोलिसांनी छापा टाकलाय. यात जुगार खेळताना रंगेहात आढळून आल्याने पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत इलेक्ट्रॉनिक कॉईन मशीन, नगदी 3250 रूपये व मोबाईल असा एकूण 1 लाख 44 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.