ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवार

Thane Mahangarpalika Election 2026: पार्टी विथ डिफरन्स असा लौकिक मिरवणाऱ्या भाजपने गेल्या काही वर्षांमध्ये निवडणुकीत जिंकण्याचे गणित जमवण्यासाठी अनेक वादग्रस्त नेत्यांना आणि व्यक्तींना पक्षात प्रवेश दिला आहे. या मांदियाळीत आता आणखी एका व्यक्तीची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदे (Mayur Shinde) याच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला होता. मयूर शिंदे यांनी संपूर्ण ठाण्यात बॅनर्स लावून आपल्या भाजप (BJP) प्रवेशाचा डंका पिटला होता. साहजिकच यावरुन टीकेची प्रचंड झोड उठली होती. त्यानंतर मयूर शिंदे याच्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याकडे भाजपचा कोणताच बडा नेता न फिरकल्याने हा पक्षप्रवेश पुढे ढकलावा लागला होता. मात्र, आता ठाणे महानगरपालिका निवडणुकीची (Thane Mahanagarpalika Election 2026) उमेदवारी यादी जाहीर होण्यास काही दिवस शिल्लक असतानाच भाजपने गुंड मयूर शिंदे याचा पक्षप्रवेश उरकून घेतला आहे. मंगळवारी संध्याकाळी ठाण्यातील  भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आमदार संजय केळकर,  आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात गुंड मयूर शिंदे याच्या हाती कमळ देऊन त्याला पावन करण्यात आले.

भाजपच्या नेत्यांनी यापूर्वीच मयूर शिंदे याचा पक्षप्रवेश पुढे गेला असला तरी त्याला कामाला लागण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले होते. कार्यकर्त्याला काम करण्यासाठी पक्षात प्रवेश करण्याची गरज नसते, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र, आता त्याला भाजपमध्ये प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मयूर शिंदेचा भाजपसाठी तन-मन-धन अर्पून काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मयूर शिंदे हा ठाण्यातील सावरकर नगर परिसरातील प्रभाग क्रमांक 14 मधून लढण्याची तयारी करत आहे. भाजपमधून तिकीट मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. आता त्याला भाजपकडून तिकीट मिळणार की नाही, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Thane Crime news: कोण आहे मयूर शिंदे?

मयूर शिंदे हा मुंबई आणि ठाण्यातील अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला आरोपी आहे. तो पूर्वी भांडूपमध्ये राहत होता. पोलिसांनी तडीपार केल्यानंतर तो ठाण्यात राहायला आला. त्यांच्यावर हत्या, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2023 साली मयूर शिंदे हा खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आला होता. याप्रकरणी त्याला अटकही झाली होती. 2017 साली मयूर शिंदे याने शिवसेनेकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, त्याला उमेदवारी मिळाली नव्हती.

आणखी वाचा

राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?

आणखी वाचा

Comments are closed.