किन्हवलीत शेतकऱ्याने सहा एकर शेत पेटवले, आधीच अस्मानी संकटात भरडलेल्या बळीराजाला कंपन्यांनी ठगवले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भरघोस पीक येईल.. आमच्या कंपनीचे बियाणे घेऊन तर बघा.. या शब्दाला भुलून किन्हवलीच्या मनोहर मलिक या शेतकऱ्याने सीड्स कंपनीचे तब्बल 14 हजार 700 रुपये किमतीचे बियाणे खरेदी केले खरे.. मात्र प्रत्यक्षात 80 टक्के पीक निकृष्ट दर्जाचे निघाले. याबाबत तक्रार केल्यानंतर पंचनामा करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांबरोबर आलेल्या बियाणे कंपनीच्या अधिकाऱ्याने बियाणे आकाशातून पडले असेल अशी मुजोरी केली. त्यामुळे संतापाचा उद्रेक झालेल्या मलिक यांनी अधिकाऱ्यांसमोरच सहा एकरावरील आपले पीक पेटवून दिले. अनपेक्षित घडलेल्या या घटनेने हादरलेल्या अधिकाऱ्यांची एकच पळापळ झाली.

शहापूर तालुवन्यातील किन्हवली परिसरातील वाचकोले येथील शेतकरी मनोहर मलिक यांनी जून महिन्यात पेरणीसाठी सरळगाव येथील सुप्रिया अॅग्रो सेंटरमधून निर्मल सीड्स कंपनीचे एक काडी प्रकाराचे NPH – 30 हे 30 किलो संकरीत भात बियाणे 14 हजार 700 रुपये किमतीला खरेदी केले होते. कंपनीकडून भरघोस उत्पादनाचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या शेतात सुमारे 80 टक्के भातपीक निकृष्ट, काळे व सुकलेले.. निघाल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. पेरणी मशागतीपासून आतापर्यंत सुमारे सहा एकरात भात बी पेरलेल्या शेतीसाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च करूनही अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने मलिक यांच्यावर आर्थिक संकट कोसळले. याप्रकरणी त्यांनी 22 ऑक्टोबर रोजी कृषी विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली.

आणि उद्रेक झाला

मलिक यांनी तक्रार केल्यानंतर कृषी सहाय्यक अंकिता मोरे, बियाणे कंपनीचा प्रतिनिधी अशोक इसामे तसेच अन्य अधिकारी पंचनामा करण्यासाठी शेताच्या बांधावर आले. पंचनामा सुरू असताना कंपनीच्या प्रतिनिधीने शेतकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ‘हे बियाणे आकाशातून पडले असेल !’ असे उपरोधिक वक्तव्य केले. त्यामुळे संतापाचा उद्रेक झालेल्या शेतकऱ्याने खिशातील माचीस बाहेर काढून संपूर्ण पिकालाच आग लावून दिली. पाहता पाहता संपूर्ण सहा एकरावर आगीच्या ज्वाळा निघाल्या आणि अख्खे पीक खाक झाले.

‘तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात देवभात प्रकारचे भात उगवले आहे, किन्हवली परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार कृषी शास्त्रज्ञांनी भेट देऊन अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविला आहे. याच शेतकऱ्याच्या बाबतीत जर कंपनीने फसवणूक केली असेल तर कंपनीवर कारवाई करण्यात येईल!’, असे शहापूरचे कृषी अधिकारी कुमार जाधव यांनी सांगितले.

Comments are closed.