हातभट्टीच्या स्फोटात मजुराचा मृत्यू, भाईंदर पालिकेचा दारू अड्ड्यावर बुलडोझर
हातभट्टीच्या स्फोटात मजुराचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर मीरा-भाईंदर पालिकने केशवसृष्टी परिसरातील तेंडुलकरवाडीच्या पाठीमागे सुरू असलेल्या या अड्ड्यावर बुलडोझर चालवला आहे. स्फोटात मजुराचा मृत्यू दडपण्यासाठी हातभट्टीचालकाने मजुराचा मृतदेह त्याच्या राहत्या खोलीत ठेवून खोलीला आग लावली होती. मात्र गुन्हे शाखेने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर हातभट्टीमालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केशवसृष्टी परिसरात सॅबेस्टीन मेंडोन्सा (54) हा तडीपार आरोपी गावठी दारूची हातभट्टी चालवत होता. या ठिकाणी 28 ऑक्टोबरच्या रात्री सिलिंडरचा स्फोट होऊन हातभट्टीवर काम करणारा तिजू चौधरी (32) याचा मृत्यू झाला तर सॅबेस्टीन आणि त्याचा भाऊ संदीप (40) जखमी झाले होते. हे प्रकरण दडपण्यासाठी सॅबेस्टीन याने तिजूचा मृतदेह तो राहात असलेल्या खोलीत ठेवला आणि खोलीला आग लावली. या आगीत तिजूचा मृत्यू झाल्याचा बनाव त्याने केला. मात्र मीरा-भाईंदर गुन्हे शाखा कक्ष-1 च्या समांतर तपासात प्रत्यक्ष घटनास्थळी हातभट्टी सुरू असल्याचे आणि स्फोट त्याच ठिकाणी झाल्याचे उघड झाले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महापालिकेच्या पथकाने संबंधित अनधिकृत बांधकामावर जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई केली. अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण, सहाय्यक आयुक्त दीपाली पोवार आणि नरेंद्र डोंगरे व अभियंता संदीप साळवे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा
एका कामगाराचा बळी घेतलेल्या या अवैध हातभट्टीचा अड्डा अखेर जमीनदोस्त झाला असला तरी अशा हातभट्ट्यांना मिळणारे अभय, हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. तडीपार आरोपींच्या वावरावर नियंत्रण ठेवण्याबाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी उत्तनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक संस्थांनी केली आहे.
Comments are closed.