अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर.

‘क्वाड’च्या बैठकीत सामील होणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो हे क्वाडच्या बैठकीत सामील होण्यासाठी भारतात येणार आहेत. भारत ‘क्वाड्रिलेटरल सिक्युरिटी डायलॉग’ म्हणजेच क्वाडच्या एका बैठकीचे आयोजन करणार असून यात रुबियो सामील होणार असल्याची माहिती अमेरिकेच्या भारतातील दूतावासाने दिली आहे. 23-26 मे या कालावधीत रुबियो हे भारतात असणार आहे.

रुबियो यांचा हा भारताचा पहिला दौरा असून यात मंत्रिस्तरीय क्वाड बैठका, उच्चस्तरीय भेटींचा अंतर्भाव राहणार असल्याचे दूतावासाने नमूद केले आहे. रुबियो हे चालू आठवड्याच्या अखेरीस नवी दिल्लीत दाखल होतील असे संकेत अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी यापूर्वीच दिले होते.  परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे क्वाडबद्दल फारसे गंभीर नसल्याने या समुहाच्या उपयुक्ततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारतासंबंधी काही प्रतिकूल निर्णय घेत ट्रम्प यांनी क्वाड समुहाचे अस्तित्व संकटात आणल्याची चर्चा आहे. हिंदी महासागर आणि व्यापक हिंद-प्रशांत क्षेत्रात चीनच्या वाढत्या प्रभावाच्या आव्हानादाखल क्वाडला एक रणनीतिक संतुलनाच्या स्वरुपात पाहिले जाते. या समुहाची कल्पना सर्वप्रथम जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी मांडली होती. तर चीनने या समुहावर वारंवार टीका केली आहे. ट्रम्प यांनी स्वत:च्या पहिल्या कार्यकाळात क्वाडला मोठी चालना दिली होती. परंतु ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात क्वाड स्वत:चे महत्त्व गमावत राहिला.

Comments are closed.