तेरा विमाने आणि अकरा एअरबेस नष्ट.
सिंदूर अभियान’ प्रथम वर्षपूर्तीदिनी सेनादलांच्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या हानीची माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे केलेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा सूड उगविण्यासाठी भारताने यशस्वी केलेल्या ‘सिंदूर अभियाना’चा प्रथम वर्षपूर्तीदिन देशभर साजरा करण्यात आला आहे. या दिनानिमित्त भारताच्या सेनादलांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भारताने केलेल्या पाकिस्तानच्या प्रचंड हानीची माहिती देण्यात आली. या कार्यवाहीत भारताच्या वायुदलाने मोठा पराक्रम गाजवून पाकिस्तानची 13 युद्धविमाने निकामी केली, तर त्या देशाचे 11 महत्वाचे वायुतळ ध्वस्त केले, अशी माहिती दिली गेली.
भारतीय वायुदलाचे उपप्रमुख अवधेश कुमार भारती यांनी वायुदलाने त्या दिवशी केलेल्या कार्यवाहीवर नव्याने प्रकाश टाकला. या पत्रकारपरिषदेत भारतीय भूसेना आणि भारतीय नौसेनेचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते. भारताने या अभिनानासाठी सज्जता कशी केली, आणि योजनेचे कार्यान्वयन किती अचूकतेने केले, यासंबंधी आतापर्यंत ज्ञात न झालेल्या अनेक घटनांवरही प्रकाश टाकण्यात आला. पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करणे हा मूळ उद्देश होता. तथापि, पाकिस्तानने भारताच्या नागरी वस्त्यांवर हल्ले करण्याचा भ्याड प्रयत्न केला. त्यामुळे भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या लष्करी आस्थापनांवर हल्ले केले.
वायूकक्षेत राहूनच कारवाई
पाकिस्तानचे वायुतळ ध्वस्त करण्याची कामगिरी भारताच्या वायुदलाने भारताच्या वायुकक्षेत राहूनच यशस्वी केली. त्यामुळे 300 किलोमीटरच्या अंतरावरुन पाकिस्तानामधील अनेक लक्ष्यांचा अचूक भेद करता आला. 7 मे च्या रात्री प्रथम पाकिस्तानचे 9 दहशतवादी तळ ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये 100 हून अधिक दहशतवादी आणि त्यांचे प्रशिक्षक मारले गेले. त्यानंतर 8 मे आणि 9 मे असे दोन दिवस पाकिस्ताच्या वायुतळांवर आणि त्यांच्या अॅवॅक्स रडार यंत्रणेवर क्षेपणास्त्रे डागून ही आस्थापने नष्ट करण्यात आली. पाकिस्ताननेही भारतावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या संरक्षणव्यवस्थेने ही सर्व क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स हवेतच नष्ट केले. त्यामुळे भारताची हानी नगण्य प्रमाणात झाली. भारताच्या सर्व सामरिक पायाभूत सुविधा सुरक्षित राहिल्या आहेत, असेही पत्रकार परिषदेत सेनादलांच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अपप्रचार म्हणजे विजय नव्हे
पाकिस्तान भारताच्या कोणत्याही हल्ल्यांचा प्रतिकार करु शकला नाही. त्याचा दारुण पराभव झाला. मात्र, तरीही निर्लज्जपणाने त्याने आपला विजय झाल्याचा अपप्रचार चालविला. असा अपप्रचार करुन संघर्षात जिंकता येत नसते, हे पाकिस्तानने समजून घेतले नाही. त्यामुळे अंतिमत: त्याचेच हसे झाले. ‘नॅरेटिव्ह’ची मांडणी म्हणजे युद्धभूमीतील पराक्रम नव्हे, हे पाकिस्तानने जाणण्याची वेळ आली आहे, अशी खोचक टिप्पणीही सेनाधिकाऱ्यांनी या पत्रकार परिषदेत केली आहे.
नौदलाचाही दबदबा
या अभियानात नौदलाने प्रत्यक्ष भाग घेतला नसला, तरी नौदलाच्या अनेक युद्धनौकांना पुढच्या स्थानांवर सज्ज ठेवण्यात आले होते. त्यांच्या ‘फॉरवर्ड पोझिशनिंग’मुळे पाकिस्तानच्या नौदलावर दबाव आला होता. त्यामुळे पाकिस्तानच्या नौदलाला कोणताही प्रतिहल्ला करता आला नाही, अशीही माहिती देण्यात आली.
उद्दिष्ट्या पूर्णत्वानंतर शस्त्रसंधी
‘सिंदूर अभियान’ साधारणत: तीन दिवस चालले. भारताने ज्या उद्देशाने ते हाती घेतले होते ते उद्देश पूर्ण झाल्यानंतर शस्त्रसंधी करण्यात आली. शस्त्रसंधीची विनंती प्रथम पाकिस्तानने केली होती, ही घटना सर्वात महत्वाची आहे. शस्त्रसंधी झाली, तरी पाकिस्तानवर ‘सिंदूर अभियाना’ची टांगती तलवार अद्यापही ठेवली गेली आहे.
‘सिंदूर अभियाना’चा अभिमान…
ड ‘सिंदूर अभियाना’च्या वर्षपूर्ती निमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित
ड सेनाधिकाऱ्यांकडून मिळाला या अभियानातील वायुदलाच्या पराक्रमाला उजाळा
ड ‘सिंदूर अभियाना’त पाकिस्ताच्या सामरिक आस्थापनांची अपरिमित हानी
Comments are closed.