नेतन्याहू राजीनामा द्या! इस्रायली जनता रस्त्यावर
इराण, लेबनॉन आणि हमास अशा तीन आघाड्यांवर युद्ध लढणाऱ्या इस्रायलच्या जनतेमध्ये असंतोष वाढत चालला आहे. पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांच्या युद्धखोरीविरोधात संताप व्यक्त करत रविवारी हजारो लोक रस्त्यावर उतरले. नेतन्याहू यांनी राजीनामा द्यावा तसेच 2023च्या ऑक्टोबरमध्ये इस्रायलमध्ये झालेल्या हल्ल्याच्या चौकशीसाठी आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
इस्रायलच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात नरसंहाराचा खटला सुरू आहे. तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नेतन्याहू यांना युद्ध गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. जगभरातून इस्रायलवर टीका होत आहे. त्यामुळेदेखील इस्रायली जनतेत रोष आहे. हा रोष व्यक्त करण्यासाठी ‘मूव्हमेंट फॉर क्वॉलिटी गव्हर्नमेंट – अँटी करप्शन वॉचडॉग’ या संघटनेने निषेध आंदोलनाची हाक दिली होती. इतर सामाजिक संघटनाही यात सहभागी झाल्या. तेल अवीवच्या हबिमा चौकातून आंदोलनाला सुरुवात झाली. हजारो लोकांनी येथे जमून घोषणाबाजी केली. जेरुसलम, हैफासह देशाच्या इतर शहरांतही हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. गाझा पट्टीतील नागरिकांवर व युद्धपैद्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधातही या वेळी आवाज उठवण्यात आला.
Comments are closed.