ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचं निधन, खांद्याला खांदा लावून लढलेला सोबती गेला, भुजबळांकडून शोक
जालना : संपूर्ण भारत ओबीसी ऑर्गनायझेशनचे नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचं आज निधन झाले. जालना (Jalna) येथील राहत्या घरी आज दुपारी साडेबारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते 79 वर्षाचे होते. गेल्या सहा महिन्यापासून ते आजारी होते. त्यांच्या निधनावर ओबीसी नेत्यांकडून शोक व्यक्त केला जात असून ओबीसी चळवळीच्या आठवणी जागवल्या जात आहेत.
सुरुवातीला मुस्लिम ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या शब्बीर अन्सारी यांनी ओबीसींच्या व्यापक चळवळीमध्ये सहभाग घेत,ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आपले आयुष्य समर्पित केले होते. नुकताच ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. कालच कुटुबीयांसमवेत त्यांनी रमजान ईद साजरी केली होती. त्यानंतर, आज दुपारी त्यांचे निधन झाले, आज रात्री इशा नमाज नंतर 9 वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल, त्यानंतर नामाज ए जनाजा अदा करून जुना जालना येथील कब्रस्तानमध्ये त्यांच्यावरती अंतिम संस्कार (दफनविधी)करण्यात येतील, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
मंडल आयोगातील चळवळीचा शिलेदार
शब्बीर अन्सारी यांच्या निधनाने मनाला खूप वेदना झाल्या. मंडल आयोग लागू करण्यासाठी उभ्या राहिलेल्या महाराष्ट्रातील चळवळीचा शिलेदार हरपला, अशी भावना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलीय. मंडळ आयोग ओबीसी चळवळ आणि देश पातळीवरची ओबीसीची चळवळ जगलेला, अवलिया आज आपल्यातून निघून गेला. माननीय शब्बीर अन्सारी यांना आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे म्हणत हाकेंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
छगन भुजबळांकडूनही श्रद्धांजली
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस आणि ऑल इंडिया ओबीसी मुस्लिम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने ओबीसी चळवळीचा बुलंद आवाज आणि लढवय्या नेता गमावला आहे. शब्बीर अन्सारी केवळ माझे सहकारी नव्हते, तर ओबीसी चळवळीतील माझे अत्यंत विश्वासू आणि खंदे सोबती होते. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी आणि बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही गेली अनेक दशके खांद्याला खांदा लावून संघर्ष केला आहे. शब्बीरभाई यांनी जात आणि वर्ग यातील फरक अचूक ओळखून मुस्लिम समाजासाठी आरक्षणाची जी कायदेशीर आणि सामाजिक मोहीम हाती घेतली होती, ती यशस्वी करून दाखवली. मुस्लिम ओबीसी समाजाला आरक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. ‘मंडलनामा’ या त्यांच्या ग्रंथामधून त्यांनी स्वतःचा आणि मुस्लिम ओबीसी संघटनेचा जो खडतर प्रवास मांडला आहे, तो सामाजिक चळवळीचा एक महत्त्वाचा दस्तऐवज असून, येणाऱ्या पिढ्यांना आपल्या हक्कासाठी सदैव प्रेरणा देत राहील. या ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले होते, ही माझ्यासाठी नेहमीच स्मरणात राहणारी बाब आहे, असे ट्विट छगन भुजबळ यांनी केलंय.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.