तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, पोलीस कारवाई
अहिल्यानगर : जिल्ह्यातील श्रीगोंदा (Ahilyanagar) तालुक्यामध्ये अलिशान कारमधुन गुटखा वाहतुक करणाऱ्यांविरुध्द अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. आरोपीकडून 28,88,330/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीगोंदा पोलीस (Police) स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करुन अवैध धंद्याची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत गुटखा वाहतुकीची माहिती मिळाली होती. त्यानुसार, नजर ठेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात गेल्या महिनाभरात अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याने, पोलीस यंत्रणाही कामाला लागल्याचं दिसून येत आहे.
तालुक्यातील मुंढेकरवाडी येथे अमोल जाधव याने प्रतिबंधित आणि शरिरास अपायकारक होईल असा गुटखा आणि सुगंधीत तंबाखु विक्री करणे करीता खरेदी केलेला असून तो त्याची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने अमोल जाधवच्या राहत्या घराजवळ जाऊन खात्री केली असता तेथे तीन जण पांढऱ्या रंगाच्या अलिशान कारमधुन काही गोण्या स्विप्ट कारमध्ये भरतांना दिसले. तेव्हा पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. त्यात आरोपी अमोल जाधव, अनिल कुरुमकर, फरहान बेपारी यांचा समावेश आहे. आरोपीकडून 6,03,200/- रु किमतीचा आर.एम.डी, विमल पान मसाला/गुटखा व्ही-1 सुगंधी तंबाखु, 22,00,000/-रु किमतीचे दोन चारचाकी वाहने त्यामध्ये अल्कायझर कार, स्विप्ट कार, 30,130/-रु रोख रक्कम, 55,000/-रु कि.चे तीन मोबाईल, चार असा एकुण 28,88,330/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
गैरवर्तन करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन
नांदेडमध्ये कर्तव्यात गैरवर्तन करून पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या दोन पोलिसांवर निलंबनाची धडक कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील उमरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार सुनील कोलबुद्धे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल महमद आवेज अशी या निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. 23 जून रोजी उमरी ते धर्माबाद रस्त्यावर शासकीय दुचाकीवरून ड्युटी बजावत असताना, या दोघांचं वर्तन अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह असल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणाची गंभीर दखल घेत, नांदेडच्या पोलीस अधीक्षकांनी आज या दोन्ही कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईच्या माध्यमातून नांदेड पोलीस दलात शिस्तभंग आणि गैरवर्तनाला अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट आणि कडक संदेश पोलीस प्रशासनानं दिला आहे.
हेही वाचा
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Comments are closed.