दोन षटकार अन् एक खास विक्रम! पदार्पणाच्या सामन्यातच वैभव सूर्यवंशीची कमाल, राहुल द्रविडच्या…
वैभव सूर्यवंशी आणि अनेक क्रिकेट चाहत्यांची इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यात महत्त्वाची प्रतीक्षा अखेर संपली. शनिवारी (४ जुलै) खेळल्या गेलेल्या या सामन्यात वैभवने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याला तिलक वर्माने पदार्पणाची कॅप दिली. त्याने भारतासाठीच्या पहिल्याच सामन्यात दोन षटकार मारले. यामुळे त्याचा एका विशेष यादीत समावेश झाला आहे.
वैभवने पहिला षटकार इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या षटकात मारला. दुसरा षटकार त्याने जोश टंगच्या षटकात मारला, टंगचाही हा आंतरराष्ट्रीय टी २० पदार्पणचा सामना होता. वैभव या सामन्यात केवळ १४ धावांची खेळी करत बाद झाला. त्याने मारलेल्या षटकारामुळे त्याचा राहुल द्रविड आणि आशिष नेहरा यांच्या खास यादीत समावेश झाला आहे.
वैभव आपल्या टी २० आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात एकापेक्षा अधिक षटकार मारणारा सहावा भारतीय खेळाडू ठरला. सध्याच्या भारतीय संघात आणखी दोन असे खेळाडू आहेत, ज्यांनी आपल्या पदार्पणाच्या सामन्यात एकापेक्षा अधिक षटकार मारले. (Multiple Sixes in T20I Debut by Indian)
उपकर्णधार तिलकने २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदापर्ण केले आणि आपल्या पहिल्या डावात तीन षटकारांसह ३९ धावा केल्या.
सध्या आयसीसी टी २० क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या ईशान किशनने २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात त्याने ४ षटकारांसह ५६ धावा केल्या.
आश्चर्याची बाब म्हणजे, या यादीत द्रविडचाही समावेश आहे. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत केवळ एकच टी २० सामना खेळला. इंग्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात त्याने २१ चेंडूंमध्ये ३ षटकारांसह ३१ धावा केल्या होत्या. या यादीत विराट कोहली आणि रोहित शर्मा या स्टार खेळांडूबरोबर माजी क्रमांक एकच खेळाडू अभिषेक शर्मा याचाही समावेश नाही.
टी २० आंतरराष्ट्रीय पदार्पणात एकापेक्षा अधिक षटकार मारणारे भारतीय खेळाडू
आशिष नेहरा
मुरली विजय
राहुल द्रविड
ईशान किशन
टिळक वर्मा
वैभव सूर्यवंशी
सामन्याची स्थिती
मॅंचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या या इंग्लंड विरुद्ध भारत दुसऱ्या टी २० सामन्यात भारताचा पराभव झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना १९० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान संघाने १९ षटकांत ४ विकेट्स गमावत लक्ष पार केले. यामध्ये जेकब बेथेलने नाबाद ७६ धावांची खेळी केली.
Comments are closed.