शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीक

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawawr) यांच्या हस्ते दिल्लीत हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते. शरद पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला, असे त्यांनी म्हटले. आता यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, संजय राऊत आता स्वतःला एवढे मोठे समजायला लागले आहेत की, ते आता शरद पवारांनी काय करावे आणि काय करू नये हे सुद्धा ते त्यांना सांगत आहेत. त्यामुळे यावर पवार साहेबांनी आपले मत व्यक्त करावे, असे मला वाटते. संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहे. ज्या आमदारांच्या मतावर निवडून आले आहेत, ज्यांनी त्यांना मतदान केले त्यांच्यावरच राऊत टीका करत आहेत. त्यांना एवढच वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.

तेव्हा तुम्ही लोकांच्या मतांशी गद्दारी केली नाही का?

ते पुढे म्हणाले की, 2019 साली शिवसेना-भाजप म्हणून विधानसभेच्या निवडणुका लढल्या आणि त्यानंतर आपण कोणासोबत गेला? तेव्हा आपण लोकांच्या मतांशी गद्दारी केली नाही का? लोकांनी त्यावेळी शिवसेना-भाजप म्हणून मतदान केले होते. तेव्हा तुम्ही काँग्रेससोबत गेलात. आपली योग्यता काय आहे हे विधानसभेच्या निवडणुकीत लोकांनी दाखवून दिलेले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला आहे, असे त्यांनी म्हटले.

एखाद्या गोष्टीचं भांडवल करण्यात काही अर्थ नाही

उदय सामंत म्हणाले की, शिंदे साहेबांचा दिल्लीत सत्कार झाला. स्वतःचा सत्कार होऊ शकत नाही, हे काही लोकांचे दुःख आहे. त्यामुळे शिंदे साहेबांना, शरद पवार साहेबांना बदनाम करायचे. मराठी साहित्य संमेलनात कुठेही पक्षाचे राजकारण नाही. शरद पवार स्वागताध्यक्ष आहेत. मी मराठी भाषेचा मंत्री म्हणून तिथे आहे. त्यामुळे उगाचच एखाद्या गोष्टीचं भांडवल करण्यात काही अर्थ नाही, असे त्यांनी म्हटले.

संजय राऊतांना वैफल्य आलंय

तसेच शंभूराज देसाई म्हणाले की, महाराष्ट्राच्या एका सुपुत्राने दुसऱ्या सुपुत्राचा सन्मान केला यात चुकीचं काय? संजय राऊत म्हणायचे शरद पवारांमुळे महाविकास आघाडी झाली हे आतापर्यंत ते बोलत होते आता संजय राऊत यांना वैफल्य आलं आहे त्यांचं स्थान दिवसेंदिवस खाली जायला लागलं आहे. त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केलंय, अशी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=38UQCA1W1K4

आणखी वाचा

Sanjay Raut: एकनाथ शिंदेंचा सत्कार अन् कौतुक ठाकरेंना झोंबलं; संजय राऊतांनी शरद पवारांना खडे बोल सुनावले

अधिक पाहा..

Comments are closed.