मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा

वाशिम : राज्यातील ऑपरेशन टायगरमुळे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला असून 6 खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंसह शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा सुरू केला आहे. उद्धव ठाकरेंनी सर्वप्रथम खासदार संजय दिना पाटील यांच्या ईशान्य मुंबईत जाहीर सभा घेऊन दौऱ्याला सुरुवात केली होती. त्यानंतर, आज वाशिम-यवतमाळ (Washim) लोकसभा मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरेंनी खासदार संजय देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी, वाशिम विधानसभा मतदारसंघातून डॉ. सिद्धार्थ देवळे यांची उमेदवारीच जाहीर केली आहे.

मी निघालो दौऱ्याला आणि बातम्या सुरु झाल्या, काहींनी कोल्हेकुई सुरू केली, उद्धव ठाकरे फिरत नाही, शिवसेना संपली. म्हणून म्हटलं आता शिवसेना दाखवतो, कडवट शिवसैनिक कुठेही गेला नाही तो तिथेच आहे. तुम्ही आमदार खासदार निवडून दिले, आता गद्दारीला थारा द्यायचा नाही, नमक हरामीला थारा द्यायचा नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदारांवर तोफ डागली. मिंदे पासून हे सगळे नमक हराम, हरामखोर आहेत, हे लुटारू माजले आहेत, राम मंदिर लुटायला लागले आहेत. बाबरी पडली तेंव्हा हे सगळे शेपूट घालून पळाले होते, शौर्य आणि भाजप हे दोन्ही विरुद्ध अर्थी शब्द आहेत. मंदिर वही बनायेंगे म्हणाले, शिवसेना प्रमुख फिरले नसते तर काळ्या कुत्राने भाजपला विचारलं नसतं, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी वाशिम दौऱ्यात भाजपवरही हल्लाबोल केला.

आता हिंदुत्वशी गद्दारी झाली आहे, फक्त उद्धव ठाकरेंसोबत झाली नाही, राम मंदिरचा मुद्दा, आपल्याशी गद्दारी केलेला मुद्दा सोडता येणार नाही. भाजपचं हिंदुत्व भोंदुत्व आहेत, आमचं हिंदुत्व हाताला काम, शेतकऱ्याला दाम देणार हिंदुत्व आहे. मी मतदारांची माफी मागायला आलो आहे, तुम्ही आपले 9 खासदार ‘मशाल’ चिन्हावर निवडून दिले. निशाणी शेवटच्या पंधरा दिवसात मिळाली होती, या माणसाने गद्दारी आधी सुद्धा केली होती. आईच्या नावाने खोटं बोलले, मी जेव्हा खासदारांची मिटींग बोलावली होती, तेंव्हा यांची खोक्यांची बोलणी सुरु होती, हा सोयारिक जुळवत होता, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी संजय देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

शेतकरी आत्महत्या करतोय, वाशिम-यवतमाळमध्ये जास्त आत्महत्या झाल्या आहेत. हे कर्जमाफी म्हणताय, माफी ही गुन्हेगाराला द्यायची असते शेतकरी गुन्हेगार नाही. त्यामुळे, कर्जमाफी नाही कर्जमुक्ती करा, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. नमक हराम मिंदे तिकडे बसले, ते विचारणार आहेत का तिकडे? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला.

सिद्धार्थ देवळे तुम्ही तयारीला लागा

नमक हराम जरी गेला तरी मी हरणार नाही, थांबणार नाही, तुमच्यासारखे शिवसैनिक माझ्या सोबत आहेत. संकटच्या छातडावर बसून त्याच्यावर भगवा फडकवणारी शिवसेना आहे. तुमचा खासदार तुम्हाला जिथे दिसेल तिथे त्याला जाब विचारा, त्याची जशी भाषा तसा जाब विचारा. मुंबईचा एक खासदार पत्रकाराला बोलला म्हणून त्याला पण तसा जाब विचारा, असे म्हणत शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी आवाहन केले. तसेच, डॉ. सिद्धार्थ देवळे किती मत मिळाली होती? आतापासूनच तुम्ही तयारीला लागा, तीन वर्ष तुमच्या हातात आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकप्रकारे सिद्धार्थ देवळेंची उमेदवारीच जाहीर केल्याचं दिसून आलं. दरम्यान, वाशिम (SC) मतदारसंघातून सिद्धार्थ देवळेंना शिवसेना महाविकास आघाडीचे तिकीट देण्यात आले. मात्र, भाजपच्या श्याम खोडे यांच्याकडून त्यांचा निसटता पराभव झाला होता.

आम्ही कामातून उत्तर देऊ – संजय राठोड

जो गरजते है वो बरसते नही अशा शब्दात मंत्री संजय राठोड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळ दौऱ्याबाबत आणि ऑपरेशन तुडवाबाबत टीका केली. कोणी कितीही धमक्या दिल्या, टीका टिपणी केली तरी त्याचे उत्तर आम्ही कामाने देऊ. आम्ही 40 आमदारांनी उठाव केला होता, त्याचे 60 आमदार झालो, अजूनही संख्या वाढत आहे. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर विश्वास ठेवून अनेकजण यायला तयार आहेत. आगामी काळात अनेक प्रवेश शिवसेनेत बघायला मिळतील. त्यामुळे कुणाच्याही टीकेला उत्तर न देता आम्ही काम करत राहू, असे संजय राठोड यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर म्हटले.

हेही वाचा

Comments are closed.