मोठी बातमी : उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा राज ठाकरे यांच्या घरी, दोन विश्वासू शिलेदारही सोबतीला!

राज ठाकरेया आणि उदव ठाकरे: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने चर्चेचा विषय ठरत असलेले ठाकरे बंधूंनी बुधवारी कोणलाही पत्ता लागून न देता पुन्हा एकदा एकमेकांची भेट घेतली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बुधवारी सकाळी अचानक राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत (Sanjay Raut) आणि अनिल परब हेदेखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले आहेत. तर मनसेकडून संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे हे अचानक राज ठाकरे यांच्या घरी गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या पाऊण तासापासून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु असल्याचे समजते. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी आहे, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, ठाकरे बंधूंच्या या वाढत्या भेटीगाठी या मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याचे द्योतक मानले जात आहे.

यापूर्वी उद्धव ठाकरे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच शिवतीर्थवर गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यादेखील शिवतीर्थवर गेल्या होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरी भोजनचा आस्वादही घेतला होता. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते. त्यामुळे ठाकरे बंधू हे वेगाने एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता आणखी वाढली आहे.

दोन दिवसांपूर्वीच राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) महाविकास आघाडीत घेण्याविषयी चर्चा झाली होती. त्यावर काँग्रेस पक्षाने सावध भूमिका घेतली होती. याविषयी आम्ही दिल्लीतील हायकमांडला विचारु, असे त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आजची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

येत्या काही दिवसांमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. राजकीय प्रथेप्रमाणे दादरच्या शिवाजी पार्कवर हा दसरा मेळावा होईल. या मेळाव्याला राज ठाकरे यांना आमंत्रित केले जाईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे आजच्या भेटीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात दसरा मेळाव्याबाबत काही चर्चा होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे सहकुटुंब गणपती दर्शनासाठी

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं. 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी निमित्त उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवतीर्थवर गेले होते. उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाज राज ठाकरे यांच्या नव्या घरी गेले होते. इथे त्यांनी सहकुटुंब चहा नाश्ता आणि गप्पा गोष्टी केल्या होत्या.

Raj Thackeray: राज ठाकरे 20 वर्षांनी मातोश्रीवर

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा हिंदीसक्तीविरोधात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.  हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे तब्बल 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले होते.यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री जात त्यांना शुभेच्छा दिल्या. अनेक वर्षानंतर राज ठाकरे मातोश्रीवर आल्याने उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले होते.

दोन दशकांपूर्वी राज ठाकरे मातोश्रीवरून बाहेर पडले तेव्हा उद्धव ठाकरे चाळीशीच्या मध्याकडे प्रवास करत होते. 2006 मध्ये मनसेची स्थापना केल्यापासून राज ठाकरे एकदाही उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसासाठी मातोश्रीवर गेले नव्हते. दरम्यान, राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर गेल्यानंतर आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी कधी जाणार? याबाबत चर्चा रंगल्या होत्या.

एमएमबाई मराठी मेलाववा: मुंबईत विलीनीकरण

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जुलै महिन्यात पहिल्यांदा एकाच व्यासपिठावर आले.त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाला शिवसेना (ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर विरोधी पक्षांनी तीव्र विरोध दर्शवला.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा एकत्र विजयी मेळावा पार पडला.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी

5 जुलै 2025 – हिंदीसक्तीविरुद्ध मेळावा – राज आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदा एकाच व्यासपीठावर

27 जुलै – उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी मातोश्रीवर येऊन शुभेच्छा दिल्या

27 ऑगस्ट – गणेश चतुर्थीनिमित्त उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी

10 सप्टेंबर –  उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर

https://www.youtube.com/watch?v=mxsg_0nvcky

आणखी वाचा

काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘सतेज’ धावा अन् मनसे एन्ट्रीवर ‘राज’ मंथन; मातोश्रीवर बैठकीत काय काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.