भाजप संपवायला निघाले आहात का? मुनगंटीवारांचा पोलिसांना सवाल करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल, गोंडपिंपरीतील जमीन मोजणी वरून वाद
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात प्रस्तावित MIDC प्रकल्पावरून शेतकरी आणि प्रशासनामधील संघर्ष आता चिघळण्याची चिन्हे आहेत. जमीन देण्यास 12 गावांतील शेतकऱ्यांचा विरोध असतानाही प्रशासनाकडून मोजणी सुरू करण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. चेकबोरगाव आणि धानापूर परिसरात मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी घेराव घालत विरोध दर्शविला. धानापूर येथील शेतकरी बालू बोनगिरवार यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली. यावेळी मुनगंटीवार यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस शिपायाशीही संवाद साधला. शेतकऱ्यांचा विरोध असताना मोजणी कशी करता? भाजपला संपवायला निघाले का? असा संतप्त सवाल त्यांनी पोलिसांना केला. हा मोबाईलवरील संवाद आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेतकऱ्यांचा विरोध असताना मोजणी होऊ देणार नाही, अशी ग्वाही देत मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. तसेच उद्योगमंत्र्यांशी चर्चा करून 22 नोव्हेंबरला चंद्रपुरात भेटून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे MIDC प्रकल्पाच्या जमीन मोजणीवरून आता राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता आहे. ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिप ची पुष्टी दैनिक सामना करत नाही. मात्र समाज माध्यमांमध्ये ही क्लिप मोठ्या प्रमाणात वायरल झाली आहे.
Comments are closed.