अमित शहांच्या हस्ते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण!
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या पुणे दौऱयावर येत आहेत. या दरम्यान पुणे जिल्हा परिषद आवारात उभारण्यात आलेल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते 16 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे.
28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आणि विकासकामांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या आवारात अजितदादा यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
शाह यांच्या दोन दिवसीय पुणे दौऱयाची सुरुवात 15 नोव्हेंबरला भारत फोर्जच्या मुंढवा येथील औद्योगिक संकुलाला भेट देऊन होईल. दुपारी एक वाजता ते भारत फोर्जला भेट देतील. त्यानंतर दुपारी 3.15 वाजता तळेगाव दाभाडे येथील एनएचईसी बहुराज्य सहकारी संस्थेच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहतील. यावेळी केंद्रीय सहकारी संस्था निबंधकांच्या प्रादेशिक कार्यालयाचे आभासी उद्घाटन आणि महाराष्ट्रासाठी भारत टॅक्सी सेवेचा औपचारिक शुभारंभही होणार आहे.
16 नोव्हेंबरला सकाळी 10.30 वाजता सेनापती बापट मार्गावरील भारतीय जैन संघटनेच्या मुख्यालयाला आणि शांतिलाल मुथा फाऊंडेशनच्या मुख्यालयाला ते भेट देतील. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता जिल्हा परिषद कार्यालयातील यशवंतराव चव्हाण भवन येथे दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होईल.
दुपारी 12 वाजता भारत इतिहास संशोधक मंडळ येथे ‘मराठा इतिहास – डिजिटल अभिलेखागार’ या उपक्रमाचे लोकार्पण शाह यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमामुळे मराठा इतिहासाशी संबंधित ऐतिहासिक दस्तऐवज आणि संदर्भ डिजिटल स्वरूपात उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. भाजपनेच केले होते आरोप 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी सातत्याने अजित पवार यांच्यावर केला होता. त्यांनाच नंतर भाजपने सत्तेत सोबत घेतले. पुण्यात पालिका निवडणुकीतही यावरून आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता अमित शहा यांना अजितदादा गटाने पुण्यात पायघडय़ा घातल्या आहेत.
Comments are closed.