आयुष म्हात्रेच्या दुखापतीबाबत अपडेट, सीएसकेचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसींनी व्यक्त केली चिंता
आयपीएल २०२६ मध्ये शनिवारी (१८ एप्रिल) संध्याकाळी सनरायझर्स हैद्राबाद (एसआरएच) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) सामना खेळला गेला. हैद्राबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात सीएसकेचा १० धावांनी पराभव झाला. या पराभवाबरोबरच संघासाठी आणखी धक्कादायक बातमी समोर येत आहे. त्यांचा युवा फलंदाज आयुष म्हात्रेला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. त्याच्या या दुखापतीची अधिक माहिती सीएसकेचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांनी दिली आहे.
“आयुष म्हात्रेच्या हॅमस्ट्रिंगमध्ये दुखापत झाली आहे. ती किती गंभीर आहे हे मला अद्याप माहित नाही. आम्ही त्याची स्कॅन चाचणी करू; परंतु दुर्दैवाने ही दुखापत खूपच गंभीर दिसत आहे. हे आमच्यासाठी एक मोठे नुकसान ठरू शकते”, असे हसी यांनी म्हटले आहे. हसींच्या वक्तव्यावरून आयुष अधिक काळ मैदानाबाहेर राहण्याची शक्यता आहे.
आयुषच्या संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो आणि त्याच्या नसण्याने संघाला मोठे नुकसान होणार आहे. त्याने अनेकदा संघाला उत्तम सुरूवात करून दिली आहे. एसआरएच विरुद्धच्या सामन्यात १९५ धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयुषने १३ चेंडूत ३० धावा केल्या. फलंदाजीवेळी एकेरी धाव घेतल्यानंतर दुहेरी धाव घेताना त्याला अडचण आली आणि तो मध्यातच थांबला. तो स्पष्टपणे अस्वस्थ दिसत असल्याने त्याला त्वरित वैद्यकिय मदतीची आवश्यकता असल्याचे दिसले. फिजिओ त्याच्यावर उपचार केल्यानंतरही वेदना होत असताना त्याने थोडावेळ फलंदाजी केली, मात्र तो बाद झाला. नंतर त्याला संघाच्या फिजिओ आणि सपोर्ट स्टाफने मैदानाबाहेर नेले. तेव्हा तो लंगडत असल्याचे दिसल्याने सीएसकेच्या गोटात चिंता वाढली.
या हंगामात आयुष सीएसकेसाठी प्रमुख फलंदाज ठरला आहे. त्याने एसआरएचविरुद्ध ३० (१३), केकेआरविरुद्ध ३८ (१७), डीसीविरुद्ध ५९ (३६) आणि पीबीकेएसविरुद्ध ४३ चेंडूत ७३ धावा केल्या आहेत. सीएसके या हंगामात केवळ दोन सामने जिंकला आहे आणि अशा स्थितीत आयुषची दुखापत त्यांच्यासाठी वाईट बातमी ठरत आहे.
एसआरएच विरुद्धच्या सामन्यानंतर हसीने आयुषच्या दुखापतीचे अपडेट दिले. ते म्हणाले, “आयुषची दुखापत अधिक गंभीर दिसते. तो एक उत्तम खेळाडू असून त्याची अनुपस्थिती संघासाठी खूप मोठी उणीव ठरेल. त्याच्याजागी दुसऱ्या कोणाला तरी संधी मिळेल. ही गोष्ट देखील रोमांचक आहे. आमच्याकडे अनेक चांगले खेळाडू आहेत.”
सीएसकेचा पुढील सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर २३ एप्रिलला खेळला जाणार आहे. यामध्ये उर्विल पटेल याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
Comments are closed.