‘राज’कृपेचा वरदहस्त दूर होताच वैभव खेडेकरांचे राजकीय ग्रह फिरले, भाजप प्रवेशासाठी मिनतवाऱ्या


Vaibhav Khedekar News: गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या संपर्कात असल्याची चर्चा असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) कोकणातील नेते वैभव खेडेकर यांचे राजकीय ग्रह सध्या प्रतिकूल असल्याचे चित्र दिसत आहे. एकेकाळी राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेल्या वैभव खेडेकर यांची अलीकडच्या काळात भाजप आणि शिंदे गटाशी जवळीक वाढली होती. यानंतर वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चितही केले होते. ही बातमी पसरताच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. परंतु, त्यानंतर वैभव खेडकर यांचा भाजप(BJP) प्रवेश लवकरच पार पडेल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, अनेक दिवस उलटूनही भाजपमध्ये त्यांचा प्रवेश होऊ शकलेला नाही. त्यांच्या भाजप पक्षप्रवेशात माशी नक्की कुठे शिंकली, हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, या सगळ्यामुळे वैभव खेडेकर यांची मानसिक चलबिचल वाढल्याचे सांगितले जात आहे.

भाजपने अद्याप वैभव खेडेकर यांना मुंबईत पक्षप्रवेशासाठी बोलावून घेतलेले नाही. जवळपास तीनवेळा त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त लांबवणीवर पडला. त्यामुळे आता वैभव खेडेकर यांनी स्वत:हूनच मुंबईत येत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. वैभव खेडेकर यांनी बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. या भेटीगाठींचे कारण अद्याप समोर आलेले नाही. वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश कधी होणार, याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. या पक्षप्रवेशासाठी वैभव खेडेकर यांना सध्या भाजप नेत्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. एकेकाळी कोकणातील मनसेचे ताकदवान नेते म्हणून वैभव खेडेकर यांची ओळख होती. मात्र, आता ‘राज’कृपेचा वरदहस्त दूर झाल्याने खेडेकर यांची अवस्था बिकट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Khed Nagarparishad: वैभव खेडेकरांना स्थानिक राजकारणात धक्का

राज ठाकरेंनी मनसे स्थापन केल्यापासून वैभव खेडेकर त्यांच्याबरोबर होते. इतकंच नाही तर खेड नगरपरिषद निवडून आणण्यात वैभव खेडेकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. ते यापूर्वी खेडचे नगराध्यक्ष होते. मात्र, यंदा खेडचे नगराध्यक्षपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने स्थानिक पातळीवरही खेडेकर यांना धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

https://www.youtube.com/watch?v=msyltw4gela

आणखी वाचा

राजसाहेब आपण फार घाई केली, तुम्ही कालही मनात होता आणि उद्याही राहाल; मनसेतून हकालपट्टी होताच वैभव खेडेकर भावूक

आणखी वाचा

Comments are closed.