‘वैभव सूर्यवंशीची खरी परीक्षा अजून बाकी’, युवा खेळाडूबाबत दिग्गज क्रिकेटरचं मोठं विधान
15व्या वर्षीच आयपीएलमध्ये गोलंदाजांची धुलाई करत क्रिकेटविश्वात खळबळ उडवणाऱ्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीबद्दल आता दिग्गज क्रिकेटपटूही मोठी मतं व्यक्त करू लागले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने वैभवच्या प्रतिभेचं जोरदार कौतुक केलं, मात्र त्याचवेळी त्याला मोठा इशाराही दिला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये मिळालेलं यश टिकवणं एक गोष्ट आहे, पण कसोटी आणि वनडेसारख्या मोठ्या फॉरमॅटमध्ये स्वतःला सिद्ध करणं ही खरी परीक्षा असेल, असं डिव्हिलियर्स यांनी म्हटलं आहे.
आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक आणि निर्भीड फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अवघ्या 15व्या वर्षी जगातील अव्वल गोलंदाजांविरुद्ध पॉवरप्लेमध्ये आक्रमक फटकेबाजी करत त्याने अनेकांना थक्क केलं. दबावाच्या परिस्थितीतही न घाबरता खेळण्याची त्याची शैली चाहत्यांना आणि क्रिकेट तज्ज्ञांना भावली आहे. त्यामुळेच तो या हंगामातील सर्वात चर्चेत असलेल्या युवा खेाडूंमध्ये गणला जात आहे.
‘फॉर द लव्ह ऑफ क्रिकेट’ पॉडकास्टमध्ये बोलताना एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, इतक्या कमी वयात अशी फलंदाजी करणं अविश्वसनीय आहे. मात्र, टी-20 आणि रेड-बॉल क्रिकेटमध्ये खूप मोठा फरक असतो. कसोटी क्रिकेटमध्ये मानसिक ताकद, संयम आणि तांत्रिक कौशल्याची खरी कसोटी लागते. वैभवमध्ये प्रचंड प्रतिभा आहे, पण पुढे त्याच्यासमोर किती वेगळ्या आव्हानांचा डोंगर उभा राहणार आहे, याची त्याला अजून कल्पना नसेल, असंही त्यांनी नमूद केलं.
डिव्हिलियर्सने पुढे सांगितलं की, जर वैभवने फक्त टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं तर तो खूप मोठा आणि यशस्वी खेळाडू बनू शकतो. मात्र, वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये उतरण्याचा निर्णय घेतल्यास त्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अधिक कठीण टप्प्यांचा सामना करावा लागेल. फक्त आक्रमक फलंदाजी करून मोठ्या फॉरमॅटमध्ये यश मिळत नाही, त्यासाठी सातत्य, संयम आणि मजबूत तंत्र आवश्यक असतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तरीसुद्धा, वैभवमध्ये प्रत्येक आव्हान पेलण्याची क्षमता असल्याचा विश्वास डिव्हिलियर्स व्यक्तने केला. भविष्यात तो भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळताना पाहायला आवडेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
Comments are closed.