271 चा स्ट्राइक रेट, शतक आणि चौकार-षटकारांचा पाऊस; एसआरएच विरुद्ध वैभवचा जलवा
आयपीएलच्या 19व्या हंगामातील एलिमिनेटर सामना 27 मे रोजी न्यू चंदीगडमधील मुल्लांपूर स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ क्वालिफायर-2 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध मैदानात उतरणार असून पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांवर मोठा दबाव असणार आहे. मात्र चाहत्यांच्या नजरा सर्वाधिक खिळल्या आहेत त्या 15 वर्षीय डावखुऱ्या सलामीवीर वैभव सूर्यवंशी याच्यावर.
सनरायझर्स हैदराबाद संघ त्यांच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो, पण त्यांच्याकडे तितकाच मजबूत गोलंदाजी हल्लाही आहे. अशा संघाविरुद्धही वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीची छाप सोडली आहे. वैभवने हैदराबाद विरुद्ध आतापर्यंत फक्त 2 सामने खेळले असून त्यात त्याने 103 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 51.50 इतकी असून स्ट्राइक रेट तब्बल 271.05 आहे.
याच आयपीएल हंगामात हैदराबाद विरुद्ध खेळताना एका सामन्यात वैभवला खातेही उघडता आले नव्हते. मात्र पुढच्याच सामन्यात त्याने तुफानी पुनरागमन करत केवळ 37 चेंडूत 103 धावांची वादळी शतकी खेळी साकारली होती. हैदराबाद विरुद्ध त्याच्या बॅटमधून 5 चौकार आणि 12 षटकार झळकले आहेत.
एलिमिनेटर सामना न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर स्टेडियमवर होणार असून या मैदानावरही वैभव सूर्यवंशीने प्रभावी खेळी केली आहे. त्याने येथे आतापर्यंत फक्त एक सामना खेळला असून तो लीग टप्प्यात पंजाब किंग्ज विरुद्ध झाला होता. त्या सामन्यात वैभवने 16 चेंडूत 43 धावांची स्फोटक खेळी करत 3 चौकार आणि 5 षटकार लगावले होते.
मात्र आता एलिमिनेटरसारख्या ‘करो या मरो’ सामन्यात त्याच्यासाठी आव्हान अधिक कठीण असणार आहे. कारण सनरायझर्स हैदराबाद संघ वैभवला रोखण्यासाठी पूर्ण तयारीनिशी होता मैदानात उतरणार आहे.
Comments are closed.