सूर्यवंशीचा श्रीलंकेवर क्षेपणास्त्र हल्ला; 11 चेंडूंत पन्नाशी गाठत लंकन गोलंदाजांची केली ऐशीतैशी, हिंदुस्थान ‘अ’ने दुसऱ्या विजयासह मालिका जिंकली
हिंदुस्थानी क्रिकेटचा नवा सुपरस्टार वैभव सूर्यवंशीने तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका ‘अ’च्या गोलंदाजांवर अक्षरशः क्षेपणास्त्रांचा हल्ला करत त्यांना उद्ध्वस्त केले. त्याने चक्क 11 चेंडूंत पन्नाशी गाठत लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. हिंदुस्थान अच्या 378 धावांचा पाठलाग करताना यजमान श्रीलंका ‘अ’चा डाव 311 धावांवरच संपवत 66 धावांच्या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेवरही आपला झेंडा फडकावला.
हिंदुस्थान ‘अ’ च्या डावाची सुरुवात होताच वैभव आणि प्रियांश आर्याने आक्रमणाचा झेंडा उंचावला. पहिल्याच चेंडूपासून दोघांनी श्रीलंकन गोलंदाजांवर तुटून पडत मैदानाच्या चारही बाजूंना फटकेबाजी केली. अवघ्या तीन षटकांत भारताने 50 धावांचा टप्पा ओलांडला आणि श्रीलंकेच्या छावणीत धोक्याची घंटा वाजली.
वैभवची बॅट जणू आग ओकत होती. चौकार-षटकारांचा असा वर्षाव सुरू होता की, स्कोअर बोर्ड धावत होता आणि गोलंदाजांचे चेहरे उतरले होते. वैभव खेळत असताना हिंदुस्थानचा प्रोजेक्टेड स्कोअर तब्बल 950 धावांपर्यंत पोहोचला होता. हे पाहून समालोचकांनाही डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
प्रियांश आर्यासोबत त्याने पहिल्या विकेटसाठी केवळ 53 चेंडूंत 132 धावांची भागीदारी रचली. वैभव शतकाकडे झेपावत होता; पण साहन अराचिघेच्या गोलंदाजीवर त्याची वादळी खेळी थांबली. मात्र तोपर्यंत नुकसान होऊन गेले होते. वैभवने अवघ्या 29 चेंडूंत 10 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 94 धावांचा स्फोट घडवून आणला होता. दुसरीकडे तिलक वर्माने 90 चेंडूंत 67 धावांची खेळी करून सर्वांना धक्का दिला. तरीही हिंदुस्थानने 50 षटकांत 9 बाद 377 धावा केल्या. लंकेने या धावांचा जोरदार पाठलाग केला, मात्र 19 चेंडू आधीच त्यांचा डाव 311 धावांवर संपला.
Comments are closed.