वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची ‘बोलं’दाजी

वैभव सूर्यवंशी आयपीएल 2026 : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2026) मैदानात आपल्या धडाकेबाज फलंदाजीने संपूर्ण क्रिकेट जगताला वेड लावणाऱ्या वैभव सूर्यवंशीने क्रिकेट रसिकांसह जागतिक क्रिकेटमधील दिग्गजांची मनं जिंकली आहेत. वैभवच्या या खेळीनंतर सचिन तेंडुलकरने असामान्य फलंदाजी म्हणत त्याचं कौतुक केलं. तर एकेकाळी गोलंदाजांचे कर्दनकाळ अशी ओळख असलेले विरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल यांनीदेखील वैभवचे गोडवे गायले आहेत.

आयपीएलच्या एलिमिनेटर (Eliminator) फेरीत सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या लढतीत राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळताना वैभवने अवघ्या 29 चेंडूंत 97 धावांची वादळी आणि ऐतिहासिक खेळी केली. या तुफानी खेळीत त्याने 4 चौकार आणि तब्बल 12 टोलेजंग षटकार ठोकले. पॅट कमिन्ससह हैदराबादच्या सर्वच प्रमुख गोलंदाजांची त्याने अक्षरशः धुलाई केली.

सचिन तेंडुलकर ट्विट: सचिन तेंडुलकरने 'असाधारण फलंदाजी'चे केले कौतुक

वैभव सूर्यवंशीच्या या अद्भूत खेळीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर विशेष पोस्ट शेअर करत त्याचे कौतुक केले. सचिनने लिहिले की, “वैभव सूर्यवंशीचा बॅट स्विंग अत्यंत असाधारण आहे. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे, तो लेग साईडच्या चेंडूंवर फ्रंट फुटचा अप्रतिम वापर करून शॉट मारण्यासाठी कशी जागा (Room) बनवतो. हीच स्वातंत्र्यवृत्ती त्याला बेधडक अंदाजात खेळण्याची परवानगी देते. ही खेळी खरोखरच कौतुकास्पद आणि शानदार होती.” फ्रंटफूटवरचा त्याचा खेळ कमाल असल्याचं म्हणत सचिनने त्याला शाबासकी दिली.

Vaibhav Suryavanshi Reply : …तर हा माझ्यासाठी मोठा बहुमान!

आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका व्हिडीओ क्लिपमध्ये वैभव सूर्यवंशीने सचिन तेंडुलकरने केलेल्या कौतुकावर आपली भावनिक प्रतिक्रिया दिली. वैभव म्हणाला की, “जेव्हा खुद्द ‘क्रिकेटचा देव’ तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप देतो, तेव्हा ती खरंच खूप मोठी आणि सन्मानाची गोष्ट असते. सचिन तेंडुलकर कोण आहेत, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. जर त्यांनी माझ्या खेळण्यावर असं काही ट्टीट केलं असेल, तर माझ्यासारख्या तरुण खेळाडूसाठी ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे.”

Chris Gayle Record : ख्रिस गेलचा सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडणार?

टी-२० क्रिकेटचा किंग ख्रिस गेलने वैभवच्या खेळीचा स्क्रीनशॉट शेअर करत त्याला ‘Carnage’ (गोलंदाजांचा कर्दनकाळ) अशी पदवी दिली. गेलने लिहिले, “कारनेज वैभव सूर्यवंशी, तू दुर्दैवी राहिलास, पण तू लवकरच तिथपर्यंत पोहोचशील.” आयपीएलमधील सर्वात वेगवान शतकाचा ख्रिस गेलचा विक्रम वैभवचा अवघ्या 3 धावांनी हुकला. पण हा विक्रम वैभव लवकरच मोडेल, अशी भविष्यवाणी गेलने केली आहे.

भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने देखील वैभववर कौतुकाचा वर्षाव केला. सेहवाग म्हणाला, “जर मी आज भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीत असतो, तर वैभव सूर्यवंशीला थेट भारतीय संघात (Team India) स्थान दिलं असतं.”

Orange Cap IPL 2026 : आयपीएलच्या ‘ऑरेंज कॅप’वर वैभवचा कब्जा

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 च्या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 15 डावांमध्ये एकूण 680 धावा कुटल्या आहेत. या उत्कृष्ट कामगिरीसह सध्या आयपीएल 2026 ची प्रतिष्ठित ‘ऑरेंज कॅप’ (Orange Cap) वैभवच्या डोक्यावर विराजमान आहे. या चालू हंगामात वैभवने आतापर्यंत 1 धडाकेबाज शतक आणि 4 उत्कृष्ट अर्धशतके झळकावली आहेत. राजस्थान रॉयल्सला आता फायनलमध्ये पोहोचण्यासाठी क्वालिफायर-2 च्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करावा लागणार आहे. हा सामना शुक्रवारी खेळवला जाईल.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.