पावसाळ्यानंतर मुंबईची हवा बिघडली! हायकोर्टात वनशक्तीची याचिका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पावसाळा संपल्यानंतर मुंबई आणि महानगर प्रदेशातील वायुप्रदूषणात झपाटय़ाने वाढ झाली असून, हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर पोहोचल्याचा दावा करत वनशक्ती या पर्यावरणवादी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वाढत्या वायुप्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी आज केली. मात्र, या याचिकेवर योग्य खंडपीठापुढे योग्य वेळी सुनावणी घेण्यात येईल, असे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

प्रदूषणसंदर्भात उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या याचिकेत वनशक्तीने हस्तक्षेप अर्ज केला आहे. मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांच्या खंडपीठासमोर वनशक्तीच्या वतीने ज्येष्ठ वकील जनक द्वारकादास यांनी तातडीच्या सुनावणीची मागणी केली. त्यांनी खंडपीठाला सांगितले की, पावसाळा संपल्यापासून हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे, याचा नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याला धोका

मुंबईतील हवेची गुणवत्ता ऑक्टोबर 2026 च्या सुरुवातीपासूनच झपाटय़ाने खालावली आहे. हिवाळा सुरू होण्यास जवळपास दोन महिने असतानाच प्रदूषणाची पातळी वाढल्याचे वनशक्तीने अर्जात म्हटले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) वरळी आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील केंद्रांवर तसेच मुंबई महापालिकेच्या घाटकोपर येथील केंद्रावर हवेच्या गुणवत्तेची नोंद ‘खराब’ श्रेणीत झाल्याचा दाखलाही अर्जात देण्यात आला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार मुंबईतील हवेची सध्याची गुणवत्ता मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच श्वसन आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींसारख्या संवेदनशील घटकांसाठी हानिकारक असल्याचा दावा संस्थेने केला आहे.

Comments are closed.