श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, माजी मंत्री विजय शिवतारेंना लेकीने किडनी दिली, मुंबईत प्र

मुंबई : शिंदेसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया काल (सोमवारी, ता 30) एका खासगी रुग्णालयात यशस्वीरीत्या पार पडली. विजय शिवतारे यांना त्यांची कन्या डॉ. ममता शिवतारे (Dr Mamata Shivtare) यांनी किडनी दान केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे. गेल्या काही काळापासून विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्या दोन्ही मूत्रपिंडांचे कार्य बंद पडल्याने त्यांना नियमित डायलेसिस घ्यावे लागत होते. तसेच प्रकृती खालावत चालली होती, अशा परिस्थितीत डॉ. ममता शिवतारे या वडिलांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आणि स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.

गेल्या काही वर्षांपासून शिवतारे यांना किडनीविकाराचा त्रास होता. त्यामुळे त्यांना डायलिसिसद्वारे उपचार देण्यात येत होते. सोमवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर विजय शिवतारे आणि ममता शिवतारे या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. मृत्यूशी झुंज देणाऱ्या आपल्या पित्याला नवजीवन देण्यासाठी ममता यांनी स्वतःची किडनी दान केली आहे. ममता या आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत.

तर ममता शिवतारे लांडे यांनी किडनी दान केल्यानंतर त्यांचे पती शिवदीप लांडे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहत ममता यांच्या या निर्णयाचं कौतुक करत मोठी पोस्ट लिहली आहे. “गौरी, माझ्या आयुष्यात अनेक संकटे आली, अनेक विपत्तींनी मला घेरले आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीही मला कधी डगमगवू शकली नाही, मी नेहमीच अढळ राहिलो. पण तुझ्या एका निर्णयाने… केवळ तुझ्या त्या एका निर्णयाने मला पूर्णपणे हादरवून सोडले. जेव्हा तू तुझ्या वडिलांना नवीन आयुष्य देण्यासाठी स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय/संकल्प घेतलास. तुझ्या वडिलांप्रती असलेलं तुझं हे निस्वार्थ समर्पण, तुझा त्याग आणि तुझ्या त्या हट्टीपणासमोर मी नतमस्तक आहे. खरंच नतमस्तक आहे!”.

“गेल्या तीन महिन्यांत… शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या डझनावारी वैद्यकीय चाचण्या, हजारो कागदपत्रांची ती गुंतागुंत, कायदेशीर प्रक्रिया; हे सगळं तू एकटीने सांभाळलंस. मी? मी फक्त एक मूक प्रेक्षक बनून तुला पाहत राहिलो आणि विचार करत राहिलो की, देव माणसाच्या आयुष्यात ‘मुलगी’ का पाठवतो? आज कदाचित मला या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे – आईची साथ माणसाच्या आयुष्यात एका टप्प्यापर्यंतच असते आणि आयुष्यभर त्या आईची उणीव ईश्वर ‘मुलगी’ म्हणून पूर्ण करतो. संपूर्ण आयुष्यासाठी…”

“आज मुंबईतील त्या आयसीयूमध्ये… किडनी प्रत्यारोपणानंतर जेव्हा मी तुझ्यापाशी बसून तुझ्या त्या निरागस चेहऱ्याकडे पाहतोय, तेव्हा माझ्या डोळ्यांतून वाहणारे पाणी थांबायचे नावच घेत नाहीये. का? का हे अश्रू थांबत नाहीत? मला आज उमजलंय. नातेवाइकांमध्ये भाऊ सोडून देईल, मुलगा पाठ फिरवेल, बहीण तोंड फिरवेल, अगदी पत्नीही… जीवन-मरणाच्या या युद्धभूमीवर कदाचित साथ सोडून देतील. पण मुलगी? ती निस्वार्थपणे खंबीर उभी राहते. स्वतःचा जीव धोक्यात घालूनही. गौरी, तुझे डोळे मिटलेले आहेत, पण तुझे हे प्रेम आणि तुझा हा त्याग प्रत्येक वडिलांना हेच शिकवतो की, मुलगी हे ईश्वराने दिलेले जगातील सर्वात मोठे वरदान आहे.”

कोण आहेत विजय शिवतारे?

विजय शिवतारे हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. २००९ आणि २०१४ असा सलग दोन वेळा त्यांनी विजय मिळवला होता. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. विजय शिवतारे आणि अजित पवार विरोधक होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतारेंना सांगून पाडलं होतं. मात्र २०२४ मध्ये राजकीय समीकरण बदलली. शिवसेना आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडली. फुटलेली राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपची युती झाली. शिवतारे शिंदेंच्या पक्षात सामील झाले. शिवतारेंनी पुन्हा जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला. विजय शिवतारे यांनी यापूर्वी राज्य मंत्रिमंडळात जलसंपदा राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.