विनय कुलकर्णी यांनी जन्मठेपेच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :

भाजप नेते व धारवाड जिल्हा पंचायतीचे सदस्य योगीश गौडा हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या माजी मंत्री विनय कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने ठोठावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला त्यांनी आव्हान दिले आहे. या शिक्षेच्या अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती द्यावी, अशी याचिका विनय कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

योगीश गौडा हत्या प्रकरणात विनय कुलकर्णींसह 16 दोषींना लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर एका आरोपीला 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर विनय कुलकर्णी यांचे आमदारपद रद्द झाले. ते सध्या बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहात आहेत.  जन्मठेपेच्या शिक्षेला अंतरिम स्थगिती मिळवून आमदारपद वाचविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. या प्रकरणातील आणखी एक अपराधी चंद्रशेखर इंडी याने देखील आपल्यावरील शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

सदर याचिकेवर सोमवार दि. 27 एप्रिल रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवर विनय कुलकर्णी यांचे पुढील भवितव्य अवलंबून राहणार आहे. एखाद्या वेळेस उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचा निकाल उचलून धरला तर विनय कुलकर्णी यांच्यासमोर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा पर्याय आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Comments are closed.