विराट कोहली यू-टर्न घेणार? कसोटी क्रिकेटमधील पुनरागमनाबाबत केले मोठे विधान

हिंदुस्थानचा ‘रनमशीन’ अशी ओळख बनलेल्या विराट कोहली याने 2025 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याआधी 2024 च्या वर्ल्डकपनंतर टी-20 क्रिकेटलाही रामराम ठोकला होता. आता तो फक्त एक दिवसीय क्रिकेट खेळत आहे. मात्र विराटशिवाय कसोटी सामना पाहण्यात मजा नाही. त्यामुळे त्याने पुन्हा रेड बॉल क्रिकेटमध्ये पुन्हा कमबॅक करावे अशी मागणी चाहते करत असतात. हिंदुस्थानसह जगभरातील माजी खेळाडूंनी विराटमध्ये कसोटी क्रिकेट शिल्लक असल्याचे म्हटले. मात्र विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या सर्व शक्यता फेटाळल्या आहेत. दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना त्याने याबाबत विचारलेल्या प्रश्नाला मजेशीर उत्तर दिले.

रविवारी दिल्लीत ‘one8’ या स्पोर्ट्सवेअर ब्रँडच्या लॉन्चिंग सोहळ्यात विराट बोलत होता. विराट कोहली या ब्रँडचा सह-संस्थापक आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध होस्ट आणि कॉमेडियन डॅनिश सैत करत होता. डॅनिशने एका मजेशीर गोष्टीकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. ‘one8’ ब्रँडच्या एका बुटाची किंमत 9,230 रुपये आहे आणि विशेष म्हणजे विराट कोहलीच्या कसोटी धावांची संख्याही नेमकी 9,230 इतकीच आहे.

हाच संदर्भ जोडत डॅनिशने 37 वर्षीय विराटला विचारले की, बुटांची विक्री आणि ब्रँडचा नफा वाढवण्यासाठी पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये परतून आणखी काही धावा करायला आवडेल का? यावर विराटने मिश्कीलपणे उत्तर दिले, मी माझ्या उत्पादनाची किंमत कमी ठेवणे पसंत करेन, पण मी कसोटी क्रिकेटमधून आता निवृत्त झालो आहे.

विराट कोहली याने हिंदुस्थानकडून 123 कसोटी सामने खेळले. यात 210 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने 9,230 धावा ठोकल्या. 30 शतके आणि 31 अर्धशतकांच्या मदतीने त्याने या धावा केल्या. नाबाद 254 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तो हिंदुस्थानकडून सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज आहे. त्याच्यापुढे सचिन तेंडुलकर (15,921 धावा), राहुल द्रविड (13,265 धावा) आणि सुनील गावस्कर (10,122 धावा) हे दिग्गज आहेत.

सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार

2014 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एम.एस. धोनीच्या दुखापतीमुळे विराटकडे पहिल्यांदा कसोटी संघाचे नेतृत्व आले होते. त्यानंतर तो हिंदुस्थानचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला. त्याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने 68 सामन्यांपैकी 40 सामन्यांमध्ये विजय मिळवला.

Comments are closed.