वाल्मिक कराडला दिलासा नाहीच, कोठडीतील मुक्काम आणखी 14 दिवस वाढणार
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा कोठडीतील मुक्काम आणखी काही दिवस वाढणार आहे. वाल्मिक कराड याला 22 जानेवारी बीड विशेष न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत मंगळवारी संपत आहे. मात्र, वाल्मिक कराड (Walmik Karad) याला आज न्यायालयात हजर न करताच त्याची न्यायालयीन कोठडी आणखी 14 दिवसांनी वाढवली जाणार आहे. आज बीड कारागृहाकडून जेल वॉरंट कोर्टाला पाठवले जाईल. त्यानंतर न्यायालय वाल्मिक कराड यांची कोठडी आणखी 14 दिवसांनी वाढवून देईल. त्यामुळे आज वाल्मिक कराड किंवा त्यांचे वकील अशी कुठलीही सुनावणी कोर्टात होणार नाही.
सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांची 9 डिसेंबरला केज तालुक्यात निर्घृणपणे हत्या झाली होती. वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरुन ही हत्या झाली, असा आरोप झाला होता. देशमुख यांच्या हत्येनंतर तब्बल 24 दिवस वाल्मिक कराड फरार होता. पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी अनेक पथके कामाला लावली होती. मात्र, तो पोलिसांच्या हाताला लागला नव्हता. अखेर वाल्मिक कराड 31 डिसेंबरला पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला होता. यानंतर वाल्मिक कराडचा पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी असा प्रवास सुरु झाला होता. यादरम्यान वाल्मिक कराड याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका लागल्याने त्याची इतक्यात तुरुंगातून सुटका होणे अवघड मानले जात आहे.
दरम्यानच्या काळात वाल्मिक कराड याला बीड शहर पोलीस ठाण्यात आणि बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात आल्याचा आरोप झाला होता. बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड हा पोलीस कोठडीत होता. त्यावेळी पोलीस ठाण्यात पलंग आणण्यात आले होते. हे पलंग वाल्मिक कराडसाठी असल्याची चर्चा रंगली होती. यावरुन वाद निर्माण झाला होता. तेव्हा हे पलंग वाल्मिक कराड याच्यासाठी नसून ते पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच वाल्मिक कराड याची तब्येत बिघडल्यामुळे त्याला दोन दिवसांसाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी वाल्मिक कराड याला आरोपींसाठीच्या वॉर्डमध्ये न ठेवता सर्जिकल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. या आयसीयू कक्षात अनेक सोयीसुविधा होत्या. वाल्मिक कराड याच्यासाठी आयसीयू वॉर्डमधील पेशंट इतरत्र हलवण्यात आले होते. यावरूनही बराच वादंग झाला होता.
धनंजय देशमुखांचा बीड पोलिसांवर गंभीर आरोप
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बीड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केला आहे. कृष्णा आंधळेला पोलिसांनी वेळीच अटक केली असती तर आमच्या कुटुंबावर ही दुर्दैवी वेळ आली नसती. फरार असताना तो पोलिसांसोबत फिरत होता. विष्णू चाटेचा मोबाईल मिळाला पाहिजे त्यात अनेक व्हिडिओ आहेत, असा दावा धनंजय देशमुख यांनी केला. संतोष देशमुख यांना वाचवण्यासाठी मी अनेक वरिष्ठांना फोन केले. मी कोणता वरिष्ठ अधिकारी, कुणाचं नाव घेणार नाही, पण फोन मिळाल्यानंतर हे स्पष्ट होईल, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=fpzgm6xif3u
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.