व्वा आगरकरसाहेब व्वा! 7 सामन्यांत एक विकेट, दुखापतग्रस्त असूनही अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी ‘याची’ भारतीय संघात निवड केली

अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी मंगळवारी (1 सप्टेंबर) भारतीय संघ जाहीर झाला. संघ पाहिला तर चकीत करणारे अनेक पैलू आहेत. पहिले आणि महत्त्वाचे तर पूर्णपणे फिट नसलेल्या चार खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. दुसरे ज्यांनी देशांतर्गत आणि लीग क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी केली, त्यांची पुन्हा एकदा निराशा झाली.
जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर हे सर्व पूर्णपणे फिट नसतानाही त्यांना अफगाणिस्तानविरुद्धच्या संघात निवडण्यात आले आहे. आता प्रश्न असा की, जे खेळाडू पूर्णपणे फिट आहेत त्यांना का नाही संधी दिली? पूर्णपणे फिट नसलेल्या खेळाडूंनाच का निवडले? सर्वाधिक चर्चा कृणाल पंड्याला का घेतले नाही, तर वॉशिंग्टन फिट नसूनही संघात निवडला गेला, याचीच होत आहे.
वॉशिंग्टन सुंदरला संधी देत कृणाल पंड्यावर अन्याय?
कृणाल गेल्या दोन वर्षांपासून टी 20 मध्ये चमकदार कामगिरी करत आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सलग दोन विजेतेपदामध्ये महत्त्वाची भुमिका बजावली आहे. त्याने आयपीएल 2026 मध्ये 226 धावा करत 14 विकेट्स घेत अष्टपैलू कामगिरी केली, मात्र तरीही त्याची भारतीय संघात पुनरागमन करण्याची प्रतीक्षा संपलेली नाही.
मागील सात सामन्यात एकच विकेट तरीही मिळाले संघात स्थान…
अफगाणिस्तानविरुद्ध वॉशिंग्टनला संधी देण्यात आली आहे. त्याची कामगिरी पाहिली तर तो गोलंदाजी खराब करतच आहे, तसेच तो पूर्णपणे फिटही नाही. त्याने मागील सात आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केवळ एकच विकेट घेतली आहे. त्याने शेवटची विकेट 17 जून 2026 रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात घेतली होती.
उजव्या हाताचा फिरकीपटूला आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात खेळण्याची संधी मिळाली, मात्र त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. त्याची फलंदाजी पाहिली तर तो आपल्या शेवटच्या पाच डावांमध्ये तीन वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाला. तसेच त्याने एकदा अर्धशतकी खेळीही केली आहे. त्याची ही कामगिरी पाहून त्याला पुन्हा एकदा संघात निवडण्यात आल्याने आगरकरांच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Washington Sundar selection in Team India against Afghanistan T20 Series)
अफगाणिस्ताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ – श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीशकुमार रेड्डी*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर *, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह *, अर्शदीप सिंग, हर्षित राणा *. (* फिटनेसच्या मंजुरीवर)
Comments are closed.