दोन दशकांत आपण विकसित भारताची निर्मिती नक्कीच करू.

सत्ताकाळाला 25 वर्षे पूर्ण होताना पंतप्रधान मोदी यांचा निर्धार, ‘आम्ही हे करुच’ हा दिला नवा मंत्र

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्ताप्रमुखपदाला बुधवारी सलग 25 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या निमित्त त्यांनी येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा ज्योती’ कार्यक्रमात भाषण करताना देशाला एक नवा मंत्र दिला आहे. ‘आम्ही हे करुच !’ असा हा मंत्र आहे. येत्या दोन दशकांमध्ये, अर्थात, 2047 पर्यंत भारताला ‘विकसित राष्ट्र’ घडवूच या निर्धाराचा पुनरुच्चार त्यांनी या कार्यक्रमात भाषण करताना केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात या 25 वर्षांच्या सलग कालावधीतील अनेक महत्वाच्या प्रसंगांचे सिंहावलोकन केले. आपल्या या प्रदीर्घ नेतृत्व प्रवासात ज्यांनी आपल्याला सहकार्य केले, आपल्याला काही शिकविले, तसेच आपल्याला प्रोत्साहित केले, त्या सर्व कार्यकर्त्यांचे, मार्गदर्शकांचे, सहकाऱ्यांचे आणि स्वयंसेवकांचे त्यांनी मन:पूर्वक आभार मानले. या कालखंडात आपल्याला अनेक चांगले आणि वाईट अनुभव आले. या अनुभवांनी आपल्या जीवनाला आकार दिला. ज्यांनी मला विजय मिळवून दिला, त्यांनी मला विनयशीलता आणि नम्रता शिकविली. तर ज्यांनी माझा पराभव केला, त्यांनी मला पुन्हा निर्धाराने पुन्हा विजयी होण्यास शिकविले. तसेच ज्यांनी माझ्यावर टीका केली, त्यांनी मला आत्मपरीक्षण करण्यास शिकविले. ज्यांनी मला समर्थन दिले, त्यांनी मला विश्वासाच्या सामर्थ्याचा परिचय घडविला. ज्यांनी मला विरोध केला, त्यांनी मला गणतंत्र व्यवस्थेच्या सामर्थ्य समजून घेण्यास साहाय्य केले आणि ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या, त्यांनी मला प्रोत्साहित केले आहे. आता मी तावून सुलाखून निघालेलो आहे, असे भावोत्कट प्रतिपादन त्यांनी आपल्या या भाषणात केले आहे.

अनेक घटनांनी दिले सामर्थ्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अनेक महत्वाच्या घटनांचा संदर्भ दिला. या प्रत्येक निर्णायक घटनेने आपल्याला काही ना काही दिले आहे. 2001 मध्ये गुजरातमधील भूज येथे झालेल्या भीषण भूकंपाने आपल्याला चिवटपणाने भूमीवर राहून पुनर्निर्माणाचे कार्य करण्याचा धडा दिला. यशस्वी चांद्रयान अभियानाने मला अपयश पचवून पुन्हा यश मिळविण्याचे बळ दिले. ‘कोरोना’ उद्रेकाने मला सामुहिक राष्ट्रीय जाणीवेचा परिचय करुन दिला, असे स्पष्ट करत त्यांनी प्रसार माध्यमांचेही आभार मानले. त्यांनी मला कटू-गोड अनुभवातून मार्गक्रमणा करत राहण्याची शक्ती दिली, असे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले.

कधीही नव्हतो एकाकी

आपल्या या संपूर्ण कृतीशील प्रवासात आपल्याला कधीही एकटेपण जाणवले नाही. असंख्य ज्ञात-अज्ञात स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांमध्येच मी सातत्याने राहिलो. या स्वयंसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या देशाचा सांस्कृतिक आत्मा संरक्षित केला आहे. त्यांचा सेवाभाव आणि देशाच्या उन्नतीसाठी असलेला त्यांचा समर्पण भाव माझ्यासाठी नेहमी प्रेरणादायी ठरला आहे. आपण भारतमातेची सेवा करण्यासाठी जन्मलो आहोत. आपण मानवतेचे सेवक आहोत, ही भावना याच स्वयंसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी माझ्या मनात सातत्याने जिवंत ठेवली आहे, असे स्पष्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्वांसाठी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

वेद ते विवेकानंद…

ज्या देशाची मी सेवा करीत आहे, त्याला सहस्रावधी वर्षांचा सांस्कृतिक वारसा आहे. तसेच, वेदांपासून स्वामी विवेकानंदांपर्यंत पसरलेली वैचारिक परंपरा या देशाला आहे. हा वारसा आणि ही परंपरा आपल्यासाठी नेहमीच शक्तीचा स्रोत राहिलेली आहे. या थोर परंपरेचा मी पायीक आहे, ही भावना मला नेहमीच काम करण्याची ऊर्जा पुरवते, असे मनोगतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

हे नाही व्यक्तिगत उदात्तीकरण

सलग 25 वर्षे शासनप्रमुखपदावर राहून मी विक्रम केला आहे, असे लोक म्हणतात. तथापि, माझ्यासाठी हा व्यक्तिगत उदात्तीकरणाचा भाग नाही. तसेच हा दिवसही माझ्यासाठी गर्वोनत्त होण्याचा नाही. मी पन्नाशीत होतो, तेव्हा वनवासी भागांमध्ये सेवा कार्य करीत होतो. त्यानंतर मी भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यात स्वत:ला मग्न केले. माझी राजकीय कार्यकाळ एक संघटनात्मक कार्यकर्ता म्हणून व्यतीत झाला आहे. त्या काळात मी अनेक निवडणुकांमध्ये प्रचार कार्य केले. मात्र, एकाही निवडणुकीत उमेदवार म्हणून भाग घेतला नाही. मी कधीही राजकीय ध्येयांचा पाठलाग केला नाही. तसेच राजकारणात मला कोणतेतरी पद गाठायचे आहे, अशी इच्छा बाळगली नाही. महत्वाकांक्षेसाठी नव्हे, तर ध्येयासाठी कार्य करायचे, हा माझ्यावर झालेला संस्कार आहे, असेही भावोत्कट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले आहे.

भारतनिर्मित विमानाचे स्वप्न…

एका भीषण दहशतवादी हल्ल्यातून जगाला वाचविलेले भारताचे वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांची तोंडभरुन प्रशंसा त्यांनी केली. एक दिवस असा येईल, की भारत स्वत:चे विमान निर्माण करण्यात यशस्वी होईल. तो दिन माझ्यासाठी अभिमानाचा ठरणार आहे. त्याची प्रतीक्षा करीत आहे, असे उद्गार त्यांनी काढले.

हा बुधवारचा दिवस माझ्यासाठी गेल्या 25 वर्षांमधील स्मृती जागविण्याचा आहे. तसेच तो भारताला विकसीत राष्ट्र म्हणून घडविण्याच्या ध्येयाचा परिपोष करण्याचाही आहे. 2047 पर्यंत भारताला विकसीत राष्ट्र म्हणून घडविणारच हा निर्धार करण्याचा आणि त्यादिशेने अथक कार्य करण्याचा दिन आहे, असे स्पष्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आम्ही हे करुच’ या मंत्राचा पुनरुच्चार केला.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी…

ड सलग पंचवीस वर्षांच्या कटू-गोड अनुभवांतून समजला जीवनाचा अर्थ

ड या प्रवासात सहकार्य केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा, स्वयंसेवकांचा मी ऋणी

ड 2047 पर्यंत भारताला विकसीत राष्ट्र बनविण्याचे ध्येय साध्य होणारच

 

Comments are closed.