पश्चिम बंगाल विधानसभा विसर्जित
नव्या भाजप सरकारच्या स्थापनेतील अडथळा दूर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, कोलकाता
विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव होऊनही मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यागपत्र देण्यास नकार दिल्याने अखेर पश्चिभ बंगालची विधानसभा विसर्जित करण्यात आली आहे. या राज्याचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी विधानसभा भंग करण्याचा आदेश दिला. त्यानुसार विधानसभा भंग करण्यात आली. 7 मे हा या विधानसभेच्या कार्यकालाचा अंतिम दिवस होता. कार्यकाल संपल्यानंतर कोणतीही विधानसभा कार्यरत राहू शकत नाही. या नियमानुसार विधानसभा भंग करण्याची सूचना राज्यपालांनी केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आपल्या निर्णयासाठी राज्यपाल आर. एन. रवी यांनी राज्यघटनेच्या अनुच्छेद 174 (2) (ब) चा आधार घेतला आहे. निवडणुकीत पराभव होऊनही मुख्यमंत्री त्यागपत्र देत नसेल तर राज्यपालांना या अनुच्छेदानुसार विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार आहे. या अधिकाराचा उपयोग राज्यपाल ए. आर. रवी यांनी केला आहे. त्यामुळे आता ममता बॅनर्जी यांचे मुख्यमंत्रीपद संपुष्टात आले आहे.
बॅनर्जी यांचा नकार
चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यांच्या विधानसभा निवडणुकांची मतगणना गेल्या सोमवारी, 4 मे 2026 या दिवशी पार पडली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेस सरकारचा या निवडणुकीत प्रचंड पराभव झाला. विधानसभेच्या 294 जागांपैकी भारतीय जनता पक्षाला 207 जागा प्राप्त झाल्या असून तो पक्ष आता या राज्यात सत्ता स्थापन करणार आहे. निवडणुकीत पराभव होऊनही ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिल्याने खळबळ उडाली होती. या निवडणुकीत आपला ‘नैतिक’ विजय झाला आहे, असे त्यांचे म्हणणे होते. तथापि, या विधानसभेचा कालावधी 7 मे पर्यंतच होता. परिणामी, कोणत्याही परिस्थितीत विधानसभा विसर्जित होण्याचीच स्थिती होती. तीन दिवस प्रतीक्षा करुन अंतिमत: या विसर्जनाचा निर्णय घेण्यात आला.
पुढे काय होणार…
विधानसभा भंग करण्यात आल्याने ममता बॅनर्जी सरकारही विसर्जित झाले आहे. त्यामुळे दोन तृतियांशापेक्षा अधिक बहुमत मिळविणारा भारतीय जनता पक्ष आता या राज्यात सरकार स्थापन करणार आहे. नव्या सरकारचा नेता निर्धारीत करण्यासाठी आज शुक्रवारी 8 मे या दिवशी या पक्षाच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींची बैठक कोलकाता येथे होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे या बैठकीला केंद्रीय निरीक्षक या नात्याने उपस्थित असतील. येत्या शनिवारी, अर्थात, 9 मे 2026 या दिवशी नव्या सरकारचा शपथविधी होणार अशी माहिती आहे.
राज्यपालांच्या हाती सूत्रे
विधानसभा विसर्जित केल्याने आणि अद्याप नवे सरकार स्थानापन्न न झाल्याने राज्याची सूत्रे, नव्या सरकारच्या स्थापनेपर्यंत राज्यपाल स्वत: सांभाळणार आहेत. नूतन सरकार स्थापन झाल्यानंतर हे उत्तरदायित्व या सरकारकडे हस्तांतरीत होईल. सध्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न महत्वाचा बनला आहे. निवडणूक झाल्यानंतरही हिंसाचार होण्याची या राज्याची परंपरा आहे. गेले दोन दिवस राज्याच्या अनेक भागांमधून हिंसाचार घडल्याची वृत्ते हाती येत आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये या हिंसाचारात 5 लोकांचा बळी गेला आहे. मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ स्पर्धक आणि भारतीय जनता पक्षाचे नेते शुभेंदू अधिकारी यांचे स्वीय साहाय्यक चंद्रनाथ रथ यांची हत्या वरण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांनी त्वरित त्यागपत्र देण्याचा निर्णय न घेतल्याने तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी हिंसाचार करण्यास प्रारंभ केला आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. ममता बॅनर्जी त्यांच्या पराभवाचा सूड सर्वसामान्य जनतेवर घेत आहेत. आमचे सरकार आल्यानंतर सर्व गुंडांवर कठोर कारवाई होईल, असेही प्रतिपादन भारतीय जनता पक्षाने केले आहे.
नव्या सरकाचा शपथविधी लवकरच
ड विधानसभा विसर्जित झाल्याने भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करणार
ड पक्षाची विधिमंडळ नेता निवड आज 8 मे, या दिवशी केली जाणे निश्चित
ड शनिवारी दिनांक 9 मे या दिवशी नव्या सरकारच्या शपथविधीसाठी सज्जता
Comments are closed.