टीम इंडिया सेमीफायनलमध्ये कधी अन् कोणाशी भिडणार? पाहा संपूर्ण शेड्यूल


टीम इंडियाच्या उपांत्य फेरीचे वेळापत्रक: टीम इंडिया महिला वनडे वर्ल्ड कप 2025 च्या सेमीफायनलमध्ये स्थान पक्कं करणारी चौथी आणि शेवटची टीम ठरली आहे. नवी मुंबईत 23 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला डकवर्थ-लुईस नियमांनुसार 53 धावांनी (India beat New Zealand) पराभूत करत उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. भारतासोबत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या तीन संघांनीही सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. गंमत म्हणजे ह्याच तीन संघांकडून ग्रुप स्टेजमध्ये भारताला सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला होता. आता प्रश्न असा सेमीफायनलमध्ये भारताची भिडंत कोणाशी होणार?

टीम इंडियाची पोजिशन निश्चित (India Semi-Final Fixture in Women’s World Cup)

गटफेरीतील सर्व संघांनी सहा-सहा सामने खेळल्यानंतर गुणतालिकेकडे पाहिल्यास, ऑस्ट्रेलिया 11 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका 10 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे, तर इंग्लंड 9 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने 6 गुणांसह चौथे स्थान मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. जरी भारताला अजून एक सामना बांगलादेशविरुद्ध खेळायचा आहे, तरी त्या विजयाने त्याचे स्थान बदलणार नाही. कारण त्या विजयानंतरही भारताचे एकूण गुण 8 होतील आणि तो चौथ्याच स्थानावर राहील.

अव्वल स्थानासाठी ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेत चुरस ( ICC Women’s World Cup 2025 Points Table)

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शेवटचा गटसामना होणार आहे, आणि त्यावर अव्वल स्थानाचे भविष्य ठरणार आहे. जर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तर ती 13 गुणांसह पहिल्या स्थानी कायम राहील. पण दक्षिण आफ्रिकेने जिंकले, तर तिचे गुण 12 होतील आणि ती पहिल्या क्रमांकावर जाईल. इतिहास पाहता हे कठीण आहे, कारण ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत खेळलेल्या 18 सामन्यांपैकी केवळ एकदाच विजय मिळवला आहे.

इंग्लंडलाही संधी

इंग्लंडकडेही दुसऱ्या क्रमांकावर जाण्याची संधी आहे. जर त्यांनी न्यूझीलंडला हरवले आणि दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाने पराभूत केले, तर इंग्लंड 11 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. अन्यथा ती तिसऱ्याच स्थानी राहील.

सेमीफायनल शेड्यूल, भारताचा सामना कोणाशी?

महिला वनडे वर्ल्ड कप 2025 चा पहिला सेमीफायनल 29 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात चौथ्या स्थानावरील टीम इंडिया अव्वल क्रमांकाच्या संघाशी भिडणार आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिका यांपैकी कोणाशी सामना होईल हे 25 ऑक्टोबरला निश्चित होईल. तर दुसरा सेमीफायनल दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघांमध्ये नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

हे ही वाचा –

Womens World Cup 2025 Points Table : सेमीफायनलसाठी 4 संघ ठरले, टीम इंडियाच्या विजयानंतर पॉइंट टेबलमध्ये उलथापालथ; वर्ल्डकपमधून न्यूझीलंड, पाकिस्तानसह ‘हे’ संघ बाहेर

आणखी वाचा

Comments are closed.